नागपूर : दक्षिण अमेरिकेतील ‘पेरू’मध्ये गुइलेन- बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ आजाराचा उद्रेक झाला आहे. तेथे तीन महिने आरोग्य आणीबाणी घोषित केली गेली. त्याचा उलगडा जागतिक मेंदूरोग तज्ज्ञांच्या ऑनलाईन बैठकीत झाला. जागतिक मेंदूरोग सप्ताहनिमित्त हा कार्यक्रम संपन्न झाला. या आजाराचे रुग्ण भारतातही आढळतात हे विशेष.

बैठकीला नागपुरातून वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलाॅजीचे विश्वस्त डॉ. चंद्रशेखर मेश्राम, वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. वुल्फगँग ग्रिसोल्ड, पेरुव्हियन न्यूरोलॉजिकल सोसायटीच्या माजी अध्यक्षा डॉ. मिरियम वेलार्डे यांच्यासह जगातील इतरही देशांतील मेंदूरोग तज्ज्ञ ऑनलाईन उपस्थित होते. डॉ. ग्रिसोल्ड म्हणाले, जीबीएस हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर स्वयंप्रतिकार रोगांच्या विस्तृत श्रेणीशी संबंधित आहे.

हेही वाचा – वर्धा: एकपाळा हनुमान कोणास पावला; काय आहे आख्यायिका, जाणून घ्या…

या रुग्णांच्या हाता- पायांमध्ये समस्या उद्भवते. हा रोग अनेकदा पायांमध्ये सुरू होतो आणि काही तासांपासून ते दिवसात शरीराच्या वरच्या भागात पसरू शकतो. गंभीर प्रकरणांमध्ये, गिळण्यात अडचण येते आणि श्वसनाच्या स्नायूंची कमजोरी येते. वेळीच उपचार न केल्यास ते प्राणघातक ठरू शकते. वेळीच उपचाराने लक्षणे हळूहळू कमी होतात. परंतु १५ ते २० टक्यांपर्यंत कायम विकृती राहते. पेरुव्हियन न्यूरोलॉजिकल सोसायटीच्या माजी अध्यक्षा डॉ. मिरियम वेलार्डे म्हणाले, पेरूमध्ये २० जुलै २०२३ पर्यंत जीबीएसच्या २३७ रुग्णाची नोंद झाली. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला. २०१९ मध्ये येथे ८६३ रुग्ण आढळले होते. या रुग्णांमध्ये सिंड्रोम सुरू होण्याच्या एक ते दोन आठवड्यांपूर्वी काही जिवाणू किंवा विषाणूजन्य संसर्गाचे पोटामध्ये किंवा श्वासनलिकेमध्ये संक्रमण होते. २०१९ च्या उद्रेकात कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी या जिवाणूचा संसर्ग दिसून आला होता. खराब स्वच्छताविषयक परिस्थितीदेखील या आतड्यांसंबंधी जीवानूच्या प्रसारास कारणीभूत ठरू शकते.

हेही वाचा – चंद्रपूर : पुरामुळे ६ हजार ५१८ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान; १० हजार ४२१ शेतकऱ्यांना पुराचा फटका, बळीराजा चिंतेत

डॉ. चंद्रशेखर मेश्राम म्हणाले, दरवर्षी एक लाख लोकांमध्ये केवळ एक ते दोन जीबीएसचे रुग्ण आढळतात. हा आजार सांसर्गिक नाही. हे कोणत्याही वयोगटावर परिणाम करू शकते आणि पुरुषांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आहे. भारतातही हे रुग्ण आढळतात. या रुग्णांवर लक्षणानुसार उपचार होतात. तर प्लाझ्मा आणि इतरही काही उपचाराचे तंत्र उपलब्ध असले तरी ते महाग आहे.