नागपूर : भारतात माळढोक पक्ष्याची संख्या सातत्याने कमी होत असताना राजस्थानमधील जैसलमेरच्या माळढोक संवर्धन प्रजनन केंद्रात एका पिल्लाचा जन्म झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी याच महिन्यात पिल्लू जन्माला आले होते. त्यांच्या संवर्धनासाठी काम सुरू असतानाच या पिल्लाच्या जन्माने त्या कार्याला बळ मिळाले आहे.

नष्टप्राय वर्गवारीत माळढोक पक्ष्याचा समावेश झाल्यानंतर केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय, डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्था व राजस्थान वनविभागाने त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून जैसलमेर जिल्ह्यातील सॅम व रामदेवरा येथे माळढोकचे संवर्धन प्रजनन केंद्र उभारले. भारतीय वन्यजीव संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनात या केंद्राचे काम सुरू आहे. चोहोबाजूने बंदिस्त पण नैसर्गिक अशा पक्षीगृहात माळढोक पक्ष्याच्या प्रजननासाठी काम केले जाते. या वर्षात पहिल्यांदाच माळढोकचा जन्म झाला.

हेही वाचा…‘पक्षाला ओहोटी, काँग्रेसमध्ये सोनिया व राहुल गांधीच राहणार….’

या केंद्रातील माळढोकच्या ‘लिओ’ आणि ‘टोनी’ या जोडीचे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिलन झाले. त्यानंतर मादीने दुसऱ्या आठवड्यात अंडी घातली. भारतीय वन्यजीव संस्थेच्या शास्त्रज्ञांनी ती ताब्यात घेऊन कृत्रिम उबवणीची प्रक्रिया सुरू केली. तब्बल २२ दिवसांच्या या प्रक्रियेनंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या पिल्लाचा जन्म झाला. हे पिल्लू निरोगी असून त्याचे सुरक्षित संगोपन व बारकाईने निरीक्षण केले जात आहे. यावर्षी इतर काही प्रौढ मादी प्रजनन करतील अशी अपेक्षा आहे. माळढोक भारतात १५०च्या संख्येत शिल्लक असून निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या आययुसीएनच्या (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशेन ऑफ नेचर) लाल यादीत ‘नष्टप्राय’ या वर्गवारीत आहेत. त्यांना वाचवण्यासाठी कृत्रिम प्रजनन केंद्राची मदत घेतली जात आहे. या १५० पक्ष्यांपैकी सुमारे ९० पक्षी केवळ दोन संरक्षित क्षेत्रात आढळतात. गेल्या तीन दशकांत या पक्ष्याची संख्या ७५ टक्क्यांनी कमी झाली आहे.

हेही वाचा…‘मातोश्री’ विरुद्ध ‘वर्षा’ लढत ! खुद्दार विरुद्ध गद्दार असे स्वरूप देण्याचे ठाकरेंचे डावपेच

माळढोकसाठी सॅम आणि रामदेवरा येथे दोन संवर्धन प्रजनन केंद्र आहेत. २०१९ मध्ये स्थापन झालेल्या सॅम केंद्रात १६ माळढोक आणि २०२२ मध्ये कार्यान्वित झालेल्या रामदेवरा केंद्रात १३ माळढोक घरे आहेत. सॅम केंद्रात एक नर आणि सात मादी प्रजननासाठी सक्षम आहेत. तर रामदेवरा केंद्रातील सर्व पक्षी दोन वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.