अमरावती : आजही आपल्या समाजात महिलांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. पण, तरीही काही तरूणी आहेत, ज्या अडचणींवर मात करून एक आदर्श निर्माण करतात. अशीच एक प्रेरणादायी कहाणी रसिका मुळे हिची आहे. रसिका हिने तब्बल तीन वर्षे ‘पोस्टवुमन’ ही नोकरी सांभाळून यूपीएससीची परीक्षा दिली. चौथ्या प्रयत्नात तिने यशाला गवसणी घातली. नागरी सेवा (मुख्य) परीक्षा २०२४ ची राखीव यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात रसिका हिला स्थान मिळाले आहे.
बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान रसिका मुळे हिला मिळालेला. त्यावेळी रसिका हिने आयएएस होऊन देशाची सेवा करावी, ही इच्छा रसिकाच्या वडिलांनी बोलून दाखवली होती. तिला तोवर आयएएस किंवा यूपीएससी परीक्षेविषयी काहीच माहिती नव्हती. पण, तिने मनोमनी आयएएस होण्याचे ठरवले. रसिका हिने येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणक शास्त्र अभ्यासक्रमाचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचे ठरवले. त्यानंतर ‘कॅम्पस’मधूनच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीत तिला नोकरी मिळाली. एकीकडे आपले स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द आणि दुसरीकडे घरी मदत करण्याचीही इच्छा यातून तिने नोकरी करतानाच यूपीएससी परीक्षा देण्याचे ठरवले.
पण, पहिल्या प्रयत्नात तिला यश मिळू शकले नाही. नंतर तिथे ‘टीसीएस’ची नोकरी सोडून घरी राहून अभ्यास केला. पण, दुसऱ्या प्रयत्नातही यशाने हुलकावणी दिली. नंतर तिने ॲमेझॉन कंपनीत नोकरी पत्करली. एक वर्ष तिने कामही केले. पण, यूपीएससी परीक्षा महत्वाची वाटत होती. नंतर तिला टपाल खात्यात ‘पोस्टवुमन’ म्हणून नोकरी मिळाली. तिने तीन वर्षे या सेवेत राहून अभ्यासही केला आणि परीक्षाही दिली. २०२४ च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला, तेव्हा पहिल्या यादीत तिचे नाव नव्हते, पण आता अंतिम निवड यादीत तिला स्थान मिळाले आहे. युनिक अकॅडमी अमरावती येथे प्रा.अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तिने युपीएससी ची तयारी केली.
मध्यमवर्गीय कुटुंबातील रसिका मुळे हिचे दहावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण अमरावतीतच झालेले. वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर खचून न जाता जिद्दीने तिने यूपीएससीची तयारी पूर्ण केली. दहावीत तिला ९८.१८ टक्के, तर बारावीत ९६ टक्के गुण मिळाले होते. ‘पोस्टवूमन’ म्हणून नोकरी करताना यूपीएससीची तयारी करणे हे तिच्यासाठी आव्हानात्मक काम होते. तिच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
