नागपूर: यंदाच्या महिन्यात रेशन दुकानात तीन महिन्याचे धान्य एकत्र मिळत आहे. दरिद्ररेशेखालील नागरिकांना हे धान्य नि:शुल्क मिळते. त्यामुळे काही व्यक्ती हे धान्य वस्ती- वस्तीतून खरेदी करत खुल्या बाजारात विकत आहे. पुरवठा विभागाकडून काही भागात छापा टाकून धान्य जप्त केल्यावर हा प्रकार पुढे आला. आता पुरवठा विभागाने हे धान्य विक्रणाऱ्याचे रेशन कार्डच रद्द करण्याचा विचार सुरू केला आहे.
नागपूरसह राज्यातील काही भागात रेशनचे धान्य लोकांकडून विकत घेऊन ते खुल्या बाजारात विकणारे धान्य तस्कर सक्रीय आहे. पुरवठा विभागानेही त्यांच्यावर लक्ष केंद्रीय केले आहे. आतापर्यंत नागपुरात दोन ठिकाणी धापा टाकून बरेच धान्य जप्त केले गेले. सूत्रांच्या माहितीनुसार यंदा पावसाळ्यात रेशनचे धान्य घेताना गरीब व गरजूंना अधिक त्रास होऊ नये म्हणून राज्य सरकारने तीन महिन्यांचे रेशन एकाचवेळी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रेशन वाटपाला सुरुवात झाली आहे.
तीन महिन्यांचे रेशन एकाचवेळी मिळत असल्याने साठेबाजी करणारे धान्य तस्करही सक्रीय झाले आहे. काहींनी तर रेशन दुकानांवरच ठाण मांडले आहे. अधिकचे धान्य असल्याने गरीबही थोड्या पैशांसाठी ते धान्य देण्यास तयार होतात. याचाच फायदा घेऊन ते ग्राहकांकडून धान्य विकत घेतात आणि खुल्या बाजारात विकतात. वस्त्या वस्त्यांमध्ये फिरून रेशनचे धान्य विकत घेतले जात आहे. हा प्रकार उघडकीस येताच पुरवठा विभागानेही कारवाई सुरु केली. बंगाली पंजा आणि ताजनगर परिसरात धाड टाकण्यात आली. तेथून शेकडो पोती धान्य जप्त करण्यात आले. यासोबतच रेशनचे धान्य घेऊन ते जाणीवपूर्वक विकणाऱ्यांवरही विभागाची करडी नजर आहे. हा गैरप्रकार थांबवण्यासाठी पुरवठा विभाग पुढे सरसावला आहे.
रेशनचे धान्य १२ प्रकारच्या व्हिटॅमिन्सने युक्त असल्याचा दावा..
रेशन दुकानातील तांदूळ हे पौष्टिक आहेत. त्यात आयर्न, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन बी- १२, व्हिटॅमिन- ए, व्हिटॅमिन बी- १, बी- ३ यासह एकूण १२ प्रकारची व्हिटॅमिन्स आहेत. त्यामुळे हे पौष्टिक धान्य स्वतः वापरा ते विकू नका, असे आवाहन शहर पुरवठा विभागाने केले आहे.
तस्करी करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार
रेशन धान्याची तस्करी करणारे आणि खासगी साठेबाजी करणाऱ्यांवर पुरवठा विभागाची करडी नजर आहे. त्यांच्यावर कारवाई सुरूच राहणार आहे. नागरिकांनी सुद्धा रेशनचे धान्य खुल्या बाजारात विकू नये. जाणीवपूर्वक धान्य विकताना कुणी आढळल्यास कार्ड रद्द केले जाईल, अशी माहिती नागपूर शहर पुरवठा विभागाकडून दिली गेली.