अमरावती : बडनेराचे आमदार रवी राणा यांनी माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली आहे. त्यांनी बच्चू कडू यांचा ‘टपोरी’ असा उल्लेख केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, ही त्यांची मुख्य मागणी आहे. त्यातच आता रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केल्याने पुन्हा एकदा या दोन नेत्यांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
आमदार रवी राणा म्हणाले, आपल्या जिल्ह्यात टपोरी लोक आहेत. त्यांच्या संपत्तीची पूर्ण यादी आमच्याजवळ आहे. जे स्वतःला शेतकरी नेते म्हणतात, महाराष्ट्रभर फिरत आहे, आमच्या जिल्ह्यातला हा एक माजी आमदार आहे. आपल्या संपत्तीमधील दहा टक्के जरी शेतकऱ्यांसाठी वाटप केले, तर थोडी माणुसकी शेतकऱ्यासाठी दाखवता येईल. राज्यामध्ये शेतकऱ्याच्या नावाने आपली दुकानदारी चालू करायची, हे त्यांचे काम आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाल्यानंतर रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. या निवडणुकीत बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहारचा उमेदवार रिंगणात आणला, तेव्हाच नव्या संघर्षाची बीजे पेरली गेली होती. बच्चू कडू यांनी भाजपवर टीकेची एकही संधी सोडली नाही. नवनीत राणा यांना पराभूत करणे हे आपले लक्ष्य असल्याचे त्यांनी जाहीरच केले होते.
निवडणुकीच्या निकालानंतर दहा-बारा दिवसांनी आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेऊन बच्चू कडू यांच्यावर तिखट शब्दात टीका केली होती. बच्चू कडू हे तोडपाणी करतात, नवनीत राणा यांना पराभूत करण्यासाठी त्यांना मातोश्रीवरून रसद पुरविण्यात आली, असा आरोप रवी राणांनी केला होता. त्यावर प्रत्युत्तर देत बच्चू कडूंनीही रवी राणांना न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या घरात अंतर्गत कलह आहे. नवनीत राणा या भाजपमध्ये, रवी राणा हे युवा स्वाभिमान पक्षात. त्यामुळे लोकांत संभ्रम निर्माण होऊन फसगत झाली. रवी राणांना पराभव पचवता आलेला नाही. स्वत:मुळे पराभव झाला, हे राणांना समजून आले आहे, अशी टीका बच्चू कडू यांनी केली होती.
अचलपूरची जनता बच्चू कडू यांना धडा शिकवणार, असा दावा रवी राणांनी त्यावेळी केला होता. विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांचा पराभव झाल्यानंतर रवी राणा यांनी बच्चू कडू यांना डिवचले होते. आता पुन्हा एकदा या दोन नेत्यांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत.