अमरावती : निवडणुकीत मला जर आशीर्वाद दिला नाही, तर मी पंधराशे रुपये परत घेईल, अशी धमकी आमदार रवी राणा यांनी सोमवारी आयोजित महिलांच्‍या मेळाव्‍यात बोलताना दिली, हा सर्व बहिणींचा अपमान आहे. मेळाव्‍यात सहभागी न झाल्‍यास योजनेचा लाभ मिळणार नाही, अशा धमक्‍या विविध अधिकारी, अंगणवाडी सेविकांच्‍या माध्‍यमातून महिलांना देण्‍याचे काम रवी राणा यांनी केले आहे, असा आरोप भाजपचे नेते माजी नगरसेवक तुषार भारतीय यांनी केला आहे.

रवी राणा यांना आता भाजपमधूनही विरोध वाढू लागला आहे. तुषार भारतीय हे रवी राणा यांचे विरोधक मानले जातात. नुकत्‍याच झालेल्‍या लोकसभा निवडणुकीतही त्‍यांनी राणा विरोधी भूमिका घेतली होती. दरम्‍यान, सोमवारी रवी राणा यांनी येथील संत ज्ञानेश्‍वर सांस्‍कृतिक सभागृहात मुख्‍यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थ्‍यांना प्रमाणपत्र वाटपाच्‍या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या आयोजनावर तुषार भारतीय यांनी आक्षेप नोंदवला आहे.

हेही वाचा – नागपुरात महापालिका सुस्त, नागरिक त्रस्त, काँग्रेस करणार जनजागरण

तुषार भारतीय म्‍हणाले, रवी राणा यांनी मेळाव्‍यात महिलांची गर्दी दिसावी, यासाठी विविध अधिकारी, अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधून त्‍यांना निर्देश दिले. जर महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्‍या नाहीत, तर त्‍यांना योजनेचा लाभ मिळणार नाही, अशा धमक्‍या महिलांना अंगणवाडी सेविकांच्‍या माध्‍यमातून देण्‍यात आल्‍या. ही रवी राणांची मस्‍ती याच भगिनी उतरविल्‍याशिवाय राहणार नाहीत. मुख्‍यमंत्री लाडकी बहीण योजना ही रवी राणा यांच्‍या घरची नाही, तर सरकारची आहे.

जर आपल्‍याला निवडणुकीत आशीर्वाद दिले नाहीत, तर पंधराशे रुपये परत घेऊ, अशी धमकीच रवी राणांनी मेळाव्‍यात बोलताना दिली. हा भगिनींचा अपमान आहे. रवी राणांनी याबद्दल महिलांची कान पकडून माफी मागितली पाहिजे, असे तुषार भारतीय म्‍हणाले.

हेही वाचा – गिधाडांचा प्रवास : हरियाणा ते महाराष्ट्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत बडनेरा मतदारसंघातील ८० हजार भगिनींना लाभ मिळणार असल्याचे भाजपा नेते तुषार भारतीय यांनी सांगितले. तुषार भारतीय म्‍हणाले, ज्या भगिनींनी अर्ज भरला आहे, त्या सर्वांना लाभ मिळणार असून संधीसाधू नेत्‍यांनी आपल्या मेळाव्याला आल्याशिवाय लाभ मिळणार नाही, अशा धमक्या दिल्याचे दिसून आले आहे. सर्व भाजप कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात सतर्क राहून सर्व भगिनींना याबाबत सहकार्य करावे. रक्षाबंधनाला पहिला टप्पा सर्व भगिनींच्या बँक खात्यात जमा होणार आहे. भगिनींच्या आयुष्यात मोठा बदल होणार असून कुटुंबातील आर्थिक स्थिती सुधारणार आहे.