बुलढाणा : शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि विविध मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली आज, शनिवारी, ३० ऑगस्ट रोजी मलकापूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी बांधव सहभागी झाले होते.थकित पीक विमा १००टक्के मिळावा , शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी, विवरा गावातील सोलर कंपनीने अतिक्रमण केलेला रस्ता मोकळा व्हावा, ज्वारीची खरेदी सुरू व्हावी, तसेच कापूस आणि सोयाबीनच्या आयात-निर्यात धोरणात बदल व्हावा,शेतमजुरांना विमा सुरक्षा मिळावी, जंगली जनावरांचा त्रास रोखावा या मागण्यांकडे लक्ष वेधण्यसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

या मोर्च्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेला हा मोर्चा एसडीओ कार्यालयावर येऊन धडकला.मोर्चाला संबोधित करताना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकार आणि प्रशासनावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, शेतकऱ्यांची ही लढाई दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे. सरकारने कापसावरील आयात शुल्क हटवल्याने कापसाचे भाव कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे सरकारने तातडीने आयात-निर्यात धोरणात बदल करावा. तसेच,शेतकऱ्यांना सोयाबीनला रास्त भाव मिळन्यास मदत होण्यासाठी सोयाबीनची सोयापेंड निर्यात करणे काळाची गरज ठरली आहे.आज हा मोर्चा एका वणव्यासारखा संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल. निवडणुकीपूर्वी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे.

पीक विमा कंपन्यांनी अधिक विलंब न करता शेतकऱ्यांना थकित विमा त्वरित द्यावा आदी मागण्या करून त्यांनी आंदोलनाचा इशारा दीला. सध्या आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत, मात्र सरकारने दिरंगाई केली तर आम्हाला आक्रमक आंदोलनही करावे लागेल,असा दम त्यांनी भरला.मोर्चाच्या आयोजनाची जबाबदारी अमोल राऊत आणि सचिन शिंगोटे यांनी पार पाडली. यावेळी सचिन पांडुळे,दामोदर शर्मा,गजानन भोपळे,विश्वास पाटील प्रविण पाटील,रंजीत डोसे, हर्षल मोरे, गोपाल रायपुरे, भागवत अढाव, विलास इंगळे,सुरज कोलते, गजानन नाईकवाडे,यांची प्रमुख उपस्थिती होती