चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी रवींद्र शिंदे यांची तिसऱ्यांदा तर उपाध्यक्ष पदी संजय डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली.या विजयाचे शिल्पकार आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया असून यांच्या नेतृत्वात आणि एसआयटीच्या दंडुक्याने कॉग्रेस संचालकांचा मिळालेल्या छुप्या पाठिंब्याच्या बळावर भाजपने बँकेच्या इतिहासात प्रथमच विजयाचा झेंडा फडकवला व सत्ता मिळविली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या सत्कार सोहळ्यात आमदार भांगडीया, आमदार किशोर जोरगेवार यांनी भाषणातून खासदार प्रतिभा धानोरकर, माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टिकास्त्र सोडले.
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज मंगळवारी बँकेच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. बँकेच्या एकूण २१ संचालकांपैकी खासदार प्रतिभा धानोरकर वगळता २० संचालक उपस्थित होते. यावेळी एसआयटीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या कॉग्रेस संचालकांनी नवनिर्वाचित अध्यक्ष शिंदे, उपाध्यक्ष डोंगरेंना मान डोलवत छुपा पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली.
निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपचे रवींद्र शिंदे व संजय डोंगरे यांची अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. संचालक पदाच्या निवडणूकीपर्यंत कॉग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सोबत असलेले शिंदे यांनी भाजपात प्रवेश केला. तेव्हाच बँकेत भाजपाचा अध्यक्ष शिंदे यांच्या रूपाने बसणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे आज केवळ निवडणुकीची औपचारिकता पार पडली. यावेळी बँकेच्या सभागृहात नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र शिंदे, उपाध्यक्ष संजय डोंगरे यांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी मंचावर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, विजयाचे शिल्पकार आमदार बंटी भांगडीया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार करण देवतळे, माजी मंत्री रमेश गजबे, माजी आमदार ॲड.संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, ओबीसी नेते डॉ.अशोक जीवतोडे उपस्थित होते.
यावेळी भाषणात आमदार जोरगेवार यांनी भाषणात निवडणुकीची रणनिती आखतांना सुरूवातीला काही लोकप्रतिनिधी सोबत होते तर काही विरोधात होते, काहींनी स्वत: निवडुन आल्यानंतर गद्दारी केली, काहींनी पॅनल उभे केले अशी टिका खासदार धानोरकर व आमदार मुनगंटीवार यांचे नाव न घेता केली. तर आमदार बंटी भांगडीया यांनीही सुरूवातीला जिल्ह्यातील कॉग्रेस नेते सोबत होते, मात्र विठ्ठलाचे दर्शन घेत त्यांनी वेगळा मार्ग पत्करून धोका दिला या शब्दात टिकास्त्र सोडले. परंतु अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कॉग्रेसच्या संचालकांनी साथ दिली. साथ देणाऱ्या कॉग्रेसच्या चार संचालकांनी आपला सत्कार देखील केला हे सांगण्यास भांगडीया विसरले नाही. अध्यक्षीय भाषणात मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी नोकर भरती प्रक्रियेमुळे बँक राज्यात प्रसिध्दला आली. प्रसंगी बदनामी झाली.
मात्र आता भाजपच्या रूपाने बँकेत सुर्याेदय झाला आहे. रवींद्र शिंदे यांनी अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली आहे. ते शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतील असे अहीर म्हणाले. यावेळी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी सत्काराला उत्तर देतांना बँक शंभर कोटींपेक्षा अधिकने फायद्यात आहे. तेव्हा बँकेची प्रगती साधण्यासाठीच प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी आमदार करण देवतळे, उपाध्यक्ष संजय डोंगरे याांचेही भाषण झाले.
मुनगंटीवार, भोंगळे यांची अनुपस्थिती
बँकेत भाजपचे रवींद्र शिंदे अध्यक्ष झाले. या कार्यक्रमाला भाजपाचे जिल्ह्यातील तीन आमदार उपस्थित होते. मात्र माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार देवराव भोंगळे यांची अनुपस्थिती खटकणारी होती. त्यांच्या गैरहजेरीची सर्वत्र चर्चा होती.
कॉग्रेसच्या चार संचालकांचा छुपा पाठिंबा
कॉग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचे विश्वासू संचालक जयंत टेमुर्डे, रोहित बोम्मावार, कॉग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नांमुळे विजयी झालेले कॉग्रेसचे विजय बावणे, भाजपचे सुदर्शन निमकर तथा माजी मंत्री विजय वडेट्टीवार समर्थक संचालक दामोदर मिसार निवडणुकीत व कार्यक्रमात भाजपा सोबत दिसले. तसेच कॉग्रेसच्या चार संचालकांनी छुपा पाठिंबा दिला. याचाच अर्थ कॉग्रेसच्या संचालकांनी स्वपक्षीय नेत्यांनाच मुर्ख बनविले अशीही चर्चा बँकेच्या वर्तुळात आहे.
एसआयटीची चर्चा
अध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वीच बँक नोकर भरतीची एसआयटी चौकशी सुरू झाली आहे. उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव यांच्या नेतृत्वात पाच अधिकाऱ्यांचे पथक ही चौकशी करणार आहे. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एसआयटीनी महत्वपूर्ण भूमिका वठविली अशीही चर्चा आहे.