अकोला : बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यातच खासगी कंपन्या, संस्था, शासकीय मंडळे आधी ठिकाणी योग्य उमेदवार मिळत नसल्याने असंख्य जागा रिक्त राहतात.त्यावर उपाय म्हणून कौशल्य, रोजगार व नाविन्यता विभागाने राज्यव्यापी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावे घेण्यात आले. राज्यातील १०२ मेळाव्यांमध्ये विक्रमी ५७ हजार तरुणांनी नोंदणी केली, तर २७ हजार तरुणांना एकच दिवशी रोजगार मिळाला आहे. अकोला येथे आयोजित मेळाव्यामध्ये १०७ उमेदवारांची निवड झाली.
राज्यातील तरुणांच्या करिअरमध्ये नवा अध्याय सुरु व्हावा, या उद्देशाने कौशल्य विभागाने हा अभिनव उपक्रम राबवला असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.महाराष्ट्रात विविध ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून हजारो तरुणांना खासगी तसेच शासकीय महामंडळात काम करण्याची संधी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. औद्योगिक, माहिती तंत्रज्ञान, विमा, लॉजीस्टिक, व्यवस्थापन आणि सेवा क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध असते. रोजगार मिळवून देणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश असला तरी, तरुणांना शासकीय योजनांची माहिती तसेच स्वयं रोजगाराबाबत समुपदेशन ही कौशल्य विभागामार्फत सुरू केले आहे.
अकोल्यात पंडित दीनदयाल रोजगार मेळाव्यात एकूण ४५६ उपस्थित उमेदवार होते. त्यापैकी १०७ उमेदवारांची प्राथमिक निवड झाली. आमदार वसंत खंडेलवाल यांच्या हस्ते रोजगार मेळाव्यातून नोकरी मिळालेल्या काही उमेदवारांना नियुक्तीपत्रे वाटप करण्यात आले. आमदार साजिद खान पठाण यांनीही मेळाव्याला उपस्थित राहून विविध दलनाला भेटी दिल्या.
रोजगार मेळाव्यामध्ये विविध रोजगार व स्वयंरोजगार योजना राबवणाऱ्या जिल्हा उद्योग केंद्र, खादी व ग्रामोद्योग महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ , महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधन (अमृत) महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागास महामंडळ ( ओबीसीमहामंडळ ),अण्णासाहेब पाटील महामंडळ यांची दालने देखील लावण्यात आले होते.
भविष्याचा वेध घेऊन कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आमुलाग्र बदल घडविणार आहे. केवळ पदवी घेऊन उपयोग नाही; तर भविष्याचा वेध घेऊन त्यानुसार कौशल्ये विकसित केली पाहिजेत, असे मत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी व्यक्त केले. अनेक मानवी कामे ‘एआय’कडून होत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता ‘सॉफ्ट स्किल्स’बरोबरच ‘हार्ड स्किल्स’ लागणारी कामेही पुढील काळात करू लागेल.