राजेश्वर ठाकरे

नागपूर : भारतात वैमानिकांचा परवाना मिळण्यासाठीचे निकष व्यवसायाशी विसंगत आणि वेळखाऊ असल्याने भावी वैमानिकांना या क्षेत्रात पदार्पण करण्यात अडथळा निर्माण होत आहे. परिणामी लाखो रुपये खर्च करून वैमानिकाचे प्रशिक्षण घेतलेल्यांना पोटापाण्यासाठी वेगळेच क्षेत्र निवडावे लागत आहे. अनेकजण तर कर्जबाजारी होऊन बसल्याचे चित्र आहे.

वैमानिकाचे प्रशिक्षण घेण्यासाठी भारतातून मोठय़ा प्रमाणात युवक-युवती अमेरिका, कॅनडा, न्यूझीलँडला जातात. भारतात त्यांना वैमानिक म्हणून काम करण्यासाठी नागरी उड्डाण संचलनालयाकडून (डीजीसीए) परवाना प्राप्त करावा लागतो. हा परवाना मिळवण्याची प्रक्रिया क्लिष्ट आणि वेळखाऊ आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून वैमानिकाचे प्रशिक्षण घेतलेल्या युवक-युवतींचे वैमानिक होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नसल्याचे दिसून येते. काहींनी कर्ज घेऊन वैमानिक प्रशिक्षण घेतले. परंतु, परवाना मिळवण्याच्या अडचणीमुळे वैमानिक होण्याचा नाद सोडून दिला आणि कर्ज फेडण्यासाठी वडापावचा व्यवसाय सुरू केला.

यासंदर्भात इंडिगो एअरलाईन्समधील एक अधिकारी म्हणाले, परवाना देण्यासाठी ‘डीजीसीए’ आता ऑनलाईन परीक्षा घेत आहे. ही चांगली बाब आहे. पण, निकाल लावण्यासाठी तीन-तीन महिने का लागतात? परीक्षा घेतल्यानंतर लगेच निकाल का देत नाही? दुसरे म्हणजे अभ्यासक्रम निश्चित का केला जात नाही? त्यासाठी एक विशिष्ट अभ्यासक्रमाचे पुस्तक ‘डीजीसीए’ने प्रकाशित करावे. त्यातील प्रश्न परवानासाठी अर्ज करणाऱ्यांना विचारण्यात यावे. वैमानिकाचा परवाना देण्यासाठी टीव्ही, टेलिफोन किंवा रेफ्रिजरेटर कसे काम करते, यावर प्रश्न विचारण्यात काय अर्थ आहे? एटीसी (एअर ट्रॅफिक कंन्ट्रोल)सोबत संपर्क साधण्यासाठी आरटी (रेडिओ टेलिफोनिक)कॉल कसे देतात याबद्दल प्रश्न विचारले गेले पाहिजे, असेही ते म्हणाले.

अलीकडेच फ्लॉरिडो येथून वैमानिकाचे प्रशिक्षण घेऊन भारतात परत आलेल्या एका महिलेला देखील अशाच अडचणीला सामोरे जावे लागत आहे. ती म्हणाली, इतर देशामध्ये उमेदवार परीक्षा देण्यासाठी जेव्हा तयार असतो, त्यावेळी त्याला शुल्क भरून ऑनलाईन परीक्षा देण्याची मुभा असते. भारतात मात्र अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागते. वैमानिकाच्या जीवनात वेळेला फार महत्त्व असते. त्याने किती तास उड्डाण केले, त्याला केव्हा परवाना मिळाला, त्याने शेवटचे उड्डाण केव्हा केले आणि गेल्या सहा महिन्यात उड्डाण केले की कसे, या बाबी वैमानिकासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. सहा महिन्यात उड्डाण केले नसेल तर तो वैमानिक म्हणून गणल्याच जात नाही. त्यामुळे मग पुन्हा १३ ते १५ लाख खर्च करून उड्डाण करण्यासाठी विदेशात जावे लागते. यानंतर वेळेत परवाना मिळाला नाही तर संबंधिताचे करिअर उद्ध्वस्त होते.

‘डीजीसीए’कडून अपेक्षा काय?

  • कागदपत्रे पडताळणीची प्रक्रिया वेळेच्या मर्यादेत व्हावी.
  • डीजीसीएने देश-विदेशातील फ्लाईंग क्लबची मान्यता प्राप्त करावी.
  • परवाना परीक्षेचा अभ्यासक्रम निश्चित करावा.
  • ऑनलाईन परीक्षेचा निकाल लगेच देण्यात यावा.
  • पहिल्यांदा परीक्षा देत असेल तरी त्याला परवान्यासाठी गृहीत धरावे.