मृत्यू हृदयविकाराने की विजेच्या धक्क्याने?; होप रुग्णालयाच्या द्वारावर मृतदेह ठेवून धरणे

कामठी रोडवरील होप रुग्णालयातील चौकीदाराचा कामावर असताना विजेचा धक्का लागून रविवारी रात्री मृत्यू झाला. मात्र, प्रशासनाकडून हृदयविकाराने निधन झाल्याचे दाखवले जात असल्याचा आरोप करीत संतप्त नातेवाईकांनी सोमवारी सकाळी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापुढे मृतदेह ठेवून धरणे दिले. दरम्यान, मेयोच्या शवविच्छेदनाच्या प्राथमिक तपासणीत मात्र हा मृत्यू विजेच्या धक्क्याऐवजी हृदयविकाराने होण्याची दाट शक्यता वर्तवल्या गेली आहे.

राजकुमार गुप्ता (४०) रा. रमाईनगर, नारी रोड, नागपूर असे मृत्यू झालेल्या चौकीदाराचे नाव आहे. तो दोन वर्षांपासून होप रुग्णालयात कामावर होता. रविवारी वादळी पावसामुळे परिसरातील वृक्ष पडल्यामुळे रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

डॉक्टरांकडून रुग्णालयाच्या मागे असलेले जनरेटर सुरू करण्याकरिता राजकुमारला पाठवण्यात आले. मात्र, बराच वेळ झाल्यावरही राजकुमार न परतल्याने त्याला पाहण्यासाठी काही कर्मचारी गेले असता तो खाली पडलेला दिसला. त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दोन तासांनी त्यांच्या पत्नीला कळविण्यात आले. तेथे त्यांना राजकुमारचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, राजकुमारचे हात व पाय काळे पडल्याचे बघत नातेवाईकांना संशय आला. त्यांना इतर उपस्थितांनी हा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे सांगितले. रात्रीच शवविच्छेदनाकरिता मृतदेह मेयोला हलवण्यात आला. सोमवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यावर संतप्त नातेवाईकांनी होप रुग्णालयाच्या द्वारापुढे मृतदेह ठेवत धरणे दिले.

या प्रकरणाची पाचपावली पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. आंदोलनात रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला. घटनास्थळी वेळीच पोलीस बंदोबस्त वाढवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या विषयावर होप रुग्णालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

मेयोतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शवविच्छेदनाच्या प्राथमिक तपासणीत हृदयातील वाहिन्यात अडथळे व त्याचे व्हॉल खराब झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती आहे. दुसऱ्या शवविच्छेदन अहवालातच मृत्यूचे नेमके कारण पुढे येणे शक्य आहे.

गुप्ता कुटुंब उघडय़ावर

घराची आर्थिक स्थिती नाजूक असलेल्या राजकुमार गुप्ता हा एकमेव कमावता पुरुष होता. त्यांचे आई व वडील दोघेही आधीच दगावले आहेत. त्याला पत्नी व एक तीन वर्षांचा मुलगा आहे. राजकुमार यांच्या मृत्यूमुळे या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे.

राजकुमारच्या मृत्यू विजेचा धक्का लागल्यामुळे झाला. कुटुंबातील एकुलता एक कमावता पुरुष निघून गेला आहे. रुग्णालयाने सुरक्षेच्या नियमांना हरताळ फासल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी कारवाई करावी. त्यातच रुग्णालयाकडून गुप्ता कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची गरज आहे.

प्रफुल्ल बारहाते, नातेवाईक, नागपूर