लोकसत्ता टीम

नागपूर : अतिवार्ध्यक्य, आजारपणा किंवा तत्सम कारणामुळे शारीरिक हालचाली अशक्य असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांना बँकिंग व्यवहार हाताळताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने नवीन कार्यपद्धती निश्चित केली आहे. त्यानुसार संबंधितांना संयुक्त बँक खात्याची सुविधा उपलब्ध करणे, बॅकिंग व्यवहार हाताळणीसाठी पालक नियुक्त करणे तसेच प्रत्यक्ष स्वरुपात उपस्थित राहणे शक्य नसेल किंवा पैसे काढण्याच्या पावतीवर स्वाक्षरी धनादेशावर स्वाक्षरी करता येत नसेल तर बँक अधिकाऱ्यांसमक्ष अंगठ्याचा ठसा घेऊन व्यवहार करण्याची सुविधा देण्यात आली आहे. याबाबत ११ जून रोजी अर्थखात्याने शासन निर्णय काढला आहे.

प्रचलित कार्यपद्धतीनुसार कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन बँक खात्यात जमा केले जाते. कर्मचारी गरजेप्रमाणे त्यातून रक्कम काढतात. मात्र अतिवार्ध्यक्य, दुर्धर आजारामुळे आलेली दुर्बलता व तत्सम कारणांमुळे अनेकदा निवृत्त कर्मचाऱ्यांना बँकिंक व्यवहार हाताळण्यास अडचणीत येतात असे निदर्शनास आले आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांची व त्यांच्या कटुंबियांची ही अडचण दूर करण्यासाठी प्रचलित कार्यपद्धतीत कायद्याच्या चौकटीत उपलब्ध असलेल्या इतर सुविधा कर्मचाऱ्यांना देण्यासाठी कार्यपद्धतीत स्पष्टता आणण्यात आली आहे. त्यानुसार आजारपणा किंवा तत्सम कारणामुळे ज्या कर्मचाऱ्यांना बँकिंग व्यवहार हाताळणे अडचणीचे ठरत असेल तर त्यांनी वैवाहिक जीवनसाधीदार व्यक्तीसोबत.संयुक्त बँक खात्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार पालक (गार्डियन) नियुक्तीचाही पर्याय देण्यात आला आहे.

आणखी वाचा-मध्य रेल्वे मालामाल! तिकीट तपासणीतून १३ दिवसांत १.३९ कोटींचा दंड वसूल

रिझर्व्ह बँकेने १ एप्रिल २०२४ ने एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार ज्या निवृत्तीवेतनधारकास आजारपणामुळे बँकेत प्रत्यक्ष हजर राहणे शक्य होत नाही किंवा धनादेशावर स्वाक्षरी करता येत नाही किवा पैसे काढण्याच्या फॉर्मवर त्यांच्या अंगठ्याचा ठसा उमटवण्यास असमर्थ आहेत, अशा स्थितीत बँकेचे व्यवहार करण्यासाठी संबंधित बँक अधिकारी आणि बँकेला ज्ञात असलेली अन्य एक व्यक्ती यांच्या समक्ष निवृत्तीवेतनधारकाच्या अंगठ्याचा किवा पायाच्या बोटाचा ठसा घेण्यात येईल व बँकेचे व्यवहार करता येणार आहे. विशेष म्हणजे ज्या बँकेत कर्मचाऱ्याचे खाते आहे त्याच शाखेतील अधिकारी असावा. निवृत्त कर्मचाऱ्याच्यावतीने धनादेश किंवा पैसे काढण्याच्या पावतीव्दारे बँकेतून निवृत्तीवेतनाची रक्कम जी व्यक्ती काढणार आहे. त्याची माहिती बँकेला द्यावी लागेल व त्याची ओळख दोन साक्षीदारांच्या माध्यमातून पटवून द्यावी लागणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य, केंद्र सरकारच्या सेवेतील निवृत्त कर्मचाऱ्यांपैकी अनेकांना वयोमानामुळे बँकेचे व्यवहार करणे अवघड होते. अनेकदा घरी कोणी नसल्यामुळे व आजारपणामुळे गरज असतानाही कर्मचाऱ्यांना बँकेत जाता येत नाही. त्यामुळे पैशाची अडचण निर्माण होते. दुसऱ्यांच्या माध्यमातून व्यवहार करताना फसवणुकीची भीती असते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने काही नियम तयार केले असून त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांची सोय झाली आहे.