अविष्कार देशमुख

गेल्या आठवडय़ापासून मानेवाडा भागातील श्रीहरीनगर क्रमांक एक येथील नागरिकांना गढूळ आणि दरुगधीयुक्त पाण्यामुळे आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी, येथील नागरिक पाणी विकत घेऊन तहान भागवत आहेत. याबाबत तक्रार केल्यावर ऑरेंज सिटी वॉटर वर्कस (ओसीडब्ल्यू) आणि महापलिका नेहमीप्रमाणे एकमेकांकडे बोट दाखवून पळवाट शोधत आहेत.

२६ जुल रोजी नेहमीप्रमाणे या भागात सकाळी पाच वाजता नळ आले. मात्र, नळातून गढूळ आणि दरुगधीयुक्त पाणी यायला लागले. यातील अनेकांच्या घरी आरओ वॉटर फिल्टर आहे. मात्र त्यातूनही दरुगधी येत होती. तक्रारीनंतरही ही समस्या दूर न झाल्याने या भागातील नागरिक आता विकतच्या पाण्यावर आपली तहान भागवत आहेत. यासाठी तीस रुपयांची एक कॅन याप्रमाणे दररोज ९० रुपयांचा खर्च करावा लागत आहे.  संतप्त नागरिकांनी तक्रारीचा ओघ वाढवल्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या परिसरात भेट दिली. मानेवाडा भागात विकासकामे सुरू असल्यामुळे पाणी दूषित येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी पाण्याचे नमुने घेतले आणि हे काम ओसीडब्ल्यूच्या अखत्यारित येत असल्याचे सांगून पळवाट काढली. ओसीडब्ल्यूने हे काम महापालिकेच्या कामचुकारपणामुळे झाल्याचे सांगितले.  या परिसरातील संदीप टेंभरे यांच्या मुलीचा २६ तारखेला वाढदिवस होता. त्यामुळे पाहुण्यांनी नकळत हे पाणी पिल्याने त्यांना त्रास झाला. अनेकांना रुग्णालयात धाव घ्यावी लागली.

आमच्या घरी गेल्या आठवडय़ापासून दरुगधीयुक्त पाणी येत आहे.  तक्रार केली, पण उपयोग झाला नाही. परिसरातील प्रत्येक घरी पाण्यामुळे प्रकृती बिघडली आहे. महापालिका आणि ओसीडब्ल्यूचे कर्मचारी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.

– रमा टेंभरे, नागरिक.

मानेवाडा भागात जलवाहिनी फुटल्याचे सांगण्यात येत आहे. त्या बाजूने मलवाहिनी आहे. त्यामुळे ते पाणी वारण्यायोग्य नाही. आमच्या भागात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. महापलिका आणि ओसीडब्ल्यू याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

– रिता झाडे,  नागरिक.