राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा नागपूर सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे. यात आतापर्यंत काही अधिकारी आणि एका शिक्षकाला अटक करण्यात आली. यानंतर या घोटाळ्यात स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाला मोठे यश मिळाले आहे. सायबर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात फरार असलेला लक्ष्मण उपासराव मंघाम (४७, रा. वासंती अपार्टमेन्ट आकांशी लेआऊट, दाभा) याला पोलिसांनी वाडी परिसरातील दाभा येथून मंगळवारी मध्यरात्री अटक केली.
त्याने दिलेल्या माहितीनुसार बनावट आयडी प्रकरणात नवा खुलासा झाला असून माजी उपसंचालक आणि तत्कालीन शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष असलेले डॉ. अनिल पारधी यांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
लक्ष्मण मंघाम हा काही वर्षांपूर्वी उपसंचालक कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत होता. यावेळी अनिल पारधी उपसंचालक होते. त्यांच्या काळातही अशाच प्रकारे बोगस शालार्थ आयडी तयार करून पगार काढण्यात आल्याची माहिती आहे. लक्ष्मण मंघाम याने ४०० बनावट आयडी तयार करीत अनेकांचे पगार काढले. पारधी जाताच त्याने जिल्हा परिषद मध्ये बदली करून घेतली. आता लक्ष्मण मंघामब्याला अटक होताच त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून अनिल पारधी यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेने अनेकांचे धाबे दणाणले आहे.
राज्यात २०१९ पासून अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये रूजू होणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याला ‘शालार्थ आयडी’ देण्याचा अधिकार विभागीय शिक्षण उपसंचालकांना देण्यात आला. याचा गैरफायदा घेत बनावट कागदपत्रे, शिक्षण संस्थांचा बनावट शिक्षक मान्यतेचा प्रस्ताव आणि शिक्षणाधिकाऱ्यांची खोटी स्वाक्षरी करून २०१९ पासून शेकडो शिक्षकांची भरती करण्यात आली. परंतु, २०१४ पासून गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयाच्या शिक्षक भरतीला मान्यता मिळाल्याने तेंव्हापासूनच शिक्षक रूजू झाल्याचे दाखवण्यात आले. त्यांचे ‘शालार्थ आयडी’ २०१९ पासून २०२५ पर्यंत गैरमार्गाने तयार करून आठ ते दहा वर्षांच्या थकबाकीची उचलही करण्यात आली.
या घोटाळ्यात उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह सूरज नाईक आणि इतरांना अटक केली आहे. त्यावेळी तपासात लक्ष्मण मंघाम याचे नाव समोर आले होते. तो काही वर्षे उपसंचालक कार्यालयात कार्यरत होता. त्यानंतर तो जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत होता. दरम्यान, त्याने अटकपूर्व जामीनही मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जामीन फेटाळल्यावरही तो फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. तो वाडीतील त्याच्या घरी असल्याची माहिती सदर आणि सायबर पोलिसांच्या पथकांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. तो पळून जात असताना त्याला अटक करण्यात आली.