बुलढाणा : मोताळा तालुक्यात काल रविवारी बरसलेल्या परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातले असून काही तासांताच खरीप पिकांसह फळबागांची प्रचंड नासाडी केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार मोताळा तालुक्यातील १११ गावांतील ३८ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावरील खरीप पीके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहे. रविवार, २ नोव्हेंबरला उत्तररात्री ३ वाजता प्रारंभ झालेल्या परतीच्या पावसाने काही तासांतच होत्याचे नव्हते करून टाकले. पिंप्री व पिंपळगाव महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली असून ९० मिलिमिटर पेक्षा जास्त पाऊस झाला.

बुलढाणा तालुक्यातील सात गावांतही पावसाने थैमान घातले. या दोन्ही तालुक्यांतील ११८ गावांना पावसाने तडाखा दिला. काल रविवारी व आज कृषी विभाग व अन्य यंत्रणांनी या गावांची पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला. आज संध्याकाळी जिल्हा कृषी अधीक्षक मनोज ढगे यांनी जिखाधिकारी किरण पाटील यांना प्राथमिक नुकसानीचा अहवाल सादर केला. यानुसार बुलढाणा तालुक्यातील ७ गावांतील २०८५ हेक्टर क्षेत्रावरील मका व कपाशीचे नुकसान झाले आहे. मोताळा तालुक्यातील १११ गावे बाधित झाली असून हजारो शेतकरी बाधित झाले आहेत. ३८ हजार हेक्टर वरील कापूस, मका, तूर, फळबागांचे नुकसान झाले आहे. अर्थात हा प्राथमिक अंदाज असून प्रत्यक्षात यापेक्षा कितीतरी पट नुकसान झाल्याचे शेकडो गावातील प्रत्यक्ष चित्र आहे.
कृषिप्रधान बुलढाणा जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसाने मे महिन्यातच हजेरी लावली. तेंव्हापासून बुलढाणा जिल्ह्यात मुक्कामी असलेल्या पावसाने आणि नियमित अंतराने झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीसदृश्य पावसाने खरीप हंगाम उद्ध्वस्त केला आहे.

नियमित पावसापाठोपाठ आता परतीचा पाऊसदेखील जिल्ह्यात ठाण मांडून बसल्याचे चित्र आहे. एरवी सौम्य वा फार झाले तर मध्यम स्वरूपात बरसणाऱ्या परतीच्या पावसाने काल रविवारी उत्तररात्री मोताळा तालुक्यातील अर्ध्याधिक भागात अक्षरशः थैमान घातले. मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे परिसरातील सर्वच गावांत कमिअधिक दीड ते दोन तास अतिवृष्टीसदृश्य पावसाचे तांडव पाहावयास मिळाले. अतिवृष्टीसारख्या या पावसाने खरीप पिके जमीनदोस्त केली. शेकडो हेक्टर शेत जमिनीवर पाणी साचले आहे.