लोकसत्ता टीम

यवतमाळ : दीड वर्षापूर्वीच्या वादाचा बदला म्हणून शेजारी राहणाऱ्या युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही घटना आज, मंगळवारी दुपारी शहरानजीक लोहारा येथे घडली.

जय विजय पाटील (२६) रा. पंचशीलनगर लोहारा असे मृताचे नाव आहे. त्याचा शेजारी राहणाऱ्या दिगांबर उर्फ दीक्षित हिरणवाडे याच्याशी वाद होता दोघांमध्ये नेहमीच खटके उडत होते. दोन वर्षापूर्वी शुभेच्छा फलक फाडल्यावरून प्रकरण विकोपाला गेले होते. त्यावेळी जय पाटील याने चाकू हल्ला करून दिगांबर हिरणवाडे याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पाठीत खुपसलेला चाकू घेऊन दिगांबर शासकीय रुग्णालयात वेळेत पोहोचल्याने बचावला होता. शस्त्रक्रियेनंतर त्याचा जीव वाचला. मात्र त्यानंतर या दोघांत सतत वाद सुरू होते. दोघेही शेजारी राहत असल्याने हा वाद धुमसत राहिला. दिगांबर जुन्या हल्ल्याचा वचपा काढण्याच्या प्रतीक्षेत होता. आज त्याने जय पाटील हा ड्युटीवरुन परत आला असता वाद उकरून काढला व त्याच्यावर चाकूने वार केले. यात जय गंभीर जखमी झाला.

आणखी वाचा-देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले “मी नागपुरी, मला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुटुंबीयांनी त्याला शासकीय रुग्णालयात आणले. तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे लोहारा पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर घटनास्थळी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. किरकोळ कारणाने वाढत गेलेल्या वादातून तरुणाचा बळी गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. या आठवड्यातील हा चौथा खून आहे.