नागपूर : जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न होऊनही वन्यजीवांच्या अवयवांपासून तयार होणाऱ्या उत्पादनांची मागणी वाढतच आहे. यामुळे वन्यप्राण्यांच्या आंतरराष्ट्रीय संवर्धन उद्दिष्टांना धक्का बसला आहे. दरम्यान, व्हिएतनामसारख्या देखात वाघांच्या हाडांपासून तयार होणाऱ्या गोंदाची मागणी वाढत आहे. २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या एक अहवालात व्हिएतनाममध्ये २०१८ आणि २०२१च्या दरम्यान १८५ टक्क्यांनी वाढ दिसून आली. त्यामुळे राज्यात अलीकडेच बहेलिया शिकाऱ्यांच्या अटकेनंतर वाघांच्या शिकारीची संख्या मोठी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

मध्यभारतातील ज्या ज्या प्रदेशात वाघांची संख्या मोठी आहे, ते प्रमुख क्षेत्र आंतरराष्ट्रीय वन्यजीव अवयवांच्या तस्कराचे लक्ष्य बनले आहे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथे काही दिवसांपूर्वीच वाघांच्या शिकारीसाठी ओळखल्या जाणाऱ्या बहेलिया टोळीला अटक करण्यात आली. अजित राजगोंड व त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या वाघांच्या शिकारीनंतर त्या अवयवांची विक्री आंतरराष्ट्रीय बाजारात झाल्याचे दोन आरोपींच्या अटकेनंतर आणि कोट्यावधी रुपयांचा आर्थिक व्यवहार उघडकीस आल्यानंतर स्पष्ट झाले. त्यांनी देशभरातच वाघाच्या शिकारी केल्या असून गेल्या दोन वर्षात सुमारे ५० वाघ मारला गेल्याचा अंदाज आहे.

खात्यातील अधिकाऱ्यांनी देखील हे प्रकरण मागील बारा वर्षातील शिकारीच्या प्रकरणांपेक्षा मोठे असल्याचे सांगितले. वाघांच्या अवयवांच्या तस्करीत धोका असल्याने वाघांच्या हाडांचे गोंद तयार करुन ते केकच्या स्वरुपात विकने जते. खरेदीदार देखील यासाठी मागेल ती किंमत द्यायला तयार आहेत. आंतरराष्ट्रीय तस्कराच्या आदेशानेच या शिकाऱ्यांनी महाराष्ट्रासह मध्यभारतात शिकारी केल्या आहेत. दरम्यान, शिलाँग येथून अटक करण्यात आलेल्या दाेघांचे ही ‘म्यानमार कनेक्शन’ असल्याचे सांगितले जात आहे.

मध्यप्रदेशमधील ‘स्पेशल टायगर स्ट्राईक फोर्स’ भारत, चीन आणि व्हिएतनाममधील वाघांच्या अवयवांच्या तस्करीचा मागोवा घेत आहेत. ‘ट्रॅफिक’ या संस्थेच्या अहवालानुसार २०२२ च्या पहिल्या सहा महिन्यात इंडोनेशिया, थायलंड आणि रशियासारख्या देशांमध्ये जप्तींमध्ये लक्षणीय वाढ झाली. जून २०२१ ते जुलै २०२३ दरम्यान, एका अभ्यासात व्हिएतनाममधील प्रमुख ई-कॉमर्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वाघांसह धोक्यात असलेल्या प्रजातींपासून बनवलेल्या उत्पादनांची व्यापक उपलब्धता दिसून आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.