देशातील जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले मोदी सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. मागील आठ वर्षात देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती सिलिंडरचे दर दिवसागणिक वाढत आहेत. जीवनावश्यक वस्तूंवरही जीएसटी लावण्याचा निर्णय घेऊन सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल केले. हे सर्व केंद्र सरकारचे पाप असल्याचा आरोप चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस समिती अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी तथा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी केला.

महागाई, बेरोजगारी, ‘अग्निपथ’ योजना व जीएसटीविरोधात आंदोलन करण्याचे निर्देश प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी दिले होते. त्यानुसार चंद्रपूर शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस वतीने तिवारी यांच्या नेतृत्वात शुक्रवारी जटपुरा गेट परिसरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा परिसरात केंद्र सरकारविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. तर ग्रामीण अध्यक्ष देवतळे यांनी घुग्गुस येथे आंदोलन केले. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तसेच पथनाट्याच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात जनजागृती करण्यात आली. त्यानंतर शहर पोलिसांनी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अटक करून सुटका केली.

आंदोलनात शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश अडूर यांच्यासह माजी नगरसेवक, युवक काँग्रेस, एनग्यूआय, सेवादल, अनुसूचित जाती विभाग, ओबीसी विभाग, अल्पसंख्याक सेलसह अन्य विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.