नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर असलेल्या नागपूर शहरात नागपूर महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी नाग नदी, पिवळी नदी, पोहरा नदीची स्वच्छता सुरू आहे. परंतु पावसाळा तोंडावर आला असतांनाही १० किलोमिटर नदीची स्वच्छता शिल्लक आहे. त्यामुळे वेळेत ही स्वच्छता पूर्ण होणार काय? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून शहरातील नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदीची सफाई करण्यात येत आहे. त्याअंतर्गत तिनही नद्यांच्या पात्रांची ३९.०४ किलोमिटरपर्यंत सफाई करून ३० हजार ५ क्यूबिक मीटर गाळाचा उपसा केल्याचा महापालिकेचा दावा आहे. परंतु पावसाळा तोंडावर असूनही अद्याप १०.१३ किलोमिटर नद्यांची स्वच्छता शिल्लकच आहे. प्रत्येक वर्षी नागपुरात पावसाळ्यापूर्वी नाग नदी, पोहरा नदी व पिवळी नदी या तिन्ही नद्यांमधून पाण्याचा प्रवाह सुरळीत व्हावा म्हणून स्वच्छता केली जाते.

नदींमध्ये गाळ असल्यास शहरात पुराचा धोका संभावतो. तो टाळण्यासाठी नदी स्वच्छता अभियान सुरू झाले आहे. महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या सूचनेवरून अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांच्या मार्गदर्शनात हे अभियान सुरू आहे. शहरातील नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदी या तिन्ही नद्यांची एकूण लांबी ४९.१७ किलोमीटर आहे. नद्यांच्या पात्रात असलेला गाळाचा उपसा केला जात आहे. स्वच्छतेसाठी पोकलेन मशीन, टिप्पर आणि जेसीबीचा वापर केला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वच्छतेची स्थिती काय?

शहरातील नाग नदीची लांबी १६.५८ किमी, पिवळी नदीची लांबी १७,४२ किमी, पोहरा नदीची लांबी १५,१७ कि. मी. आहे. नाग नदीच्या पात्राची अंबाझरी तलाव ते पंचशील चौक, पंचशील चौक ते अशोक चौक आणि अशोक चौक ते सेंट झेव्हिअर स्कूल ते पारडी उड्डाणपूल, पारडी उड्डाणपूल ते नाग व पिवळी नदी संगम दरम्यान पाच टप्प्यांत एकूण ११.८४ कि.मी. सफाई करण्यात आल्याचा महापालिकेचा दावा आहे. परंतु अंबाझरी ते व्हीएनआयटी दरम्यानच्या नाल्यात अद्याप कचरा व गाळ दिसत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. इतरही नद्यांतील स्वच्छतेच्या दाव्यावर नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत. नदी स्वच्छता कार्य प्रगतीपथावर असून पावसाळ्यापूर्वी नद्या पूर्णपणे स्वच्छ करण्यात येतील, असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांनी केला.