नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची वक्तव्ये अनेकदा चर्चेत असतात. देश आणि जागतिक पातळीवरही त्यांच्या वक्तव्यांवर विचार केला जातो. डॉ. भागवत अनेकदा आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला आरसा दाखवण्याचा प्रयत्न करतात. अशातच त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारच्या तीन ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या स्वप्नावरून चांगलाच समाचार घेतला आहे. काय म्हणाले भागवत पाहूया.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर लावलेल्या टॅरिफवरून आता जगभरातून टीका केली जात आहे. एवढेच नाही तर अमेरिकेतील विचारवंत, अर्थशास्त्रज्ञही यावर संताप व्यक्त करत आहेत. त्यावर भारतीय अर्थव्यवस्थेची चिंता व्यक्त केली जात आहे. यानंतर नागपूरमध्ये असताना भागवत शिव मंदिरांना भेट देत भगवान शंकराचे दर्शन घेत आहेत. नागपूरमधील चारशे वर्ष जुन्या जागृतेश्वर मंदिरात दर्शन घेतल्यावर त्यांनी मार्गदर्शन केले.

सरसंघचालक पुढे म्हणाले, भगवान शंकरामध्ये प्रचंड मोठे सामर्थ्य आहे. मनुष्याला देवापर्यंत पोहचवण्याचे मार्ग शंकरांपासून निघाले आहेत. इतके सामर्थ्य असतानाही शिव विरागी वृत्तीचे आहेत. भौतिक जीवनाच्या भोगापासून ते कायम दूर राहिले. जगाचे भले व्हावे म्हणून त्यांनी विषही पिले. अशा प्रवृत्तीला सोडून चांगले दिवस आल्यामुळे आपल्याला काहीतरी मिळावे ही प्रवृत्ती वाढत आहे. परंतु, हा शंकराचा स्वभाव नाही. ज्याच्यापासून सामान्य जणांना धोका होईल ते अंगावर घेणे हा शिवाचा स्वभाव आहे. असे जीवन जगण्याची गरज आहे.

माणसाच्या हावरटपणामुळे आज संकटं आहेत. त्याच्यातील कट्टरपणामुळे राग, द्वेष वाढत असून लढाया, युद्ध होत आहेत. मला मिळायला हवे, बाकीच्यांना मिळाले नाही तरी चालेल अशी स्वार्थी वृत्ती वाढत असून ही मनुष्याची काळी बाजू आहे. ही प्रवृत्ती बदलणे आवश्यक आहे. शिवाचे पूजन करणे म्हणजे ही प्रवृत्ती बदलणे होय, असे आवाहन डॉ. भागवत यांनी केले.

नेमके काय म्हणाले भागवत?

सरसंघचालक भागवत म्हणाले, भगवान शंकरामध्ये प्रचंड मोठे सामर्थ्य आहे. मनुष्याला देवापर्यंत पोहचवण्याचे मार्ग शंकरांपासून निघाले आहेत. इतके सामर्थ्य असतानाही शिव विरागी वृत्तीचे आहेत. भगवान शंकराकडून आपण परोपकार शिकायला हवा. चांगल्या गोष्टी सर्वांसाठी द्या. अधिकाअधिक लोकांना कसे देऊ शकतो, याचा विचार करावा. यामुळेच देश मोठा होणार आहे. तीन ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनली तरी त्याचे जगाला फार आश्चर्य वाटण्याचे काहीही कारण नाही. अमेरिका आणि चीन श्रीमंत देश आहेत. जगातील अनेक देश आधीच तीन ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनले आहेत. त्यांनी केले ते आपणही करू. पण अध्यात्म, धर्म जगाकडे नाही. त्यासाठी जगातील जनता आमच्याकडे येते. त्यासाठी जग आपल्याला नमस्कार करतो. तेव्हाच आपण विश्वगुरू बनू शकतो. अर्थकारण करू नये असे नाही. मात्र, आपल्या अध्यात्माला सोडायला नको असेही डॉ. भागवत म्हणाले.