अमरावती : फासेपारधी, रामोशी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल फासेपारधी बांधवांनी आणि मुलांनी शिंगणापूर फाटा येथे आमदार शरद सोनवणे यांच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी शरद सोनवणे यांच्या प्रतिमेला चपलेने मारत निषेध व्यक्त केला. शरद सोनवणे यांनी आमदारकी रद्द करा, अशी मागणी श्री दादाजी आदिवासी फासेपारधी समाज संघटनेचे अध्यक्ष मतीन भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जुन्नरचे अपक्ष आणि शिंदे शिवसेनेचे सहयोगी आमदार शरद सोनवणे यांनी तीन दिवसांपुर्वी त्यांच्या मतदारसंघात चोऱ्या होत असून, त्या चोऱ्या फासेपारधी आणि रामोशी करीत असल्याचे विधान केले होते, याशिवाय आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या विषयी देखील अपमानजनक वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे.
मतीन भोसले यांच्या नेतृत्वात नागपूर-औरंगाबाद महामार्गावर शिंगणापूर येथे रास्ता रोको करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि आमदार शरद सोनवणे यांच्या प्रतिमेला चपलेने मारून निषेध व्यक्त केला. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना मार्गावरून हटवले.
एखादी व्यक्ती लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहामध्ये पोहचल्यानंतर ती व्यक्ती एका जातीच्या, एका धर्माच्या, एका गावाचे प्रतिनिधी राहत नाही. लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना त्याच्या सोबत असणाऱ्या विधानसभा सदस्यांसोबत सौजन्याने वागणे गरजेचे असून लोकप्रतिनिधीने सभागृहातील सदस्यांसोबत जातीच्या आधारावर भेदभापूर्ण वर्तन व व्यवहार करू नये, असे मतीन भोसले यांनी म्हटले आहे.
या प्रकरणी लोकप्रतिनिधींच्या साठी असलेल्या नियमांचा या जातीयवादी आमदाराने भंग केलेला आहे. कर्तव्यदक्ष असणाऱ्या आदिवासी विकास मंत्र्याच्या कार्यक्षमतेवर जातीय व्देषातून प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तसेच या जातीयवादी आमदाराने आदिवासी विकासमंत्र्यांचा, त्यांच्या जातीचा तुच्छपणे सार्वजनिकरित्या व जाहीरपणे अपमान केला आहे. त्यामुळे
संविधानविरोधी तसेच जातीयवादी मानसिकतेच्या शरद सोनवणे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ च्या योग्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच या जातीयवादी आमदाराला लोकप्रतिनिधी म्हणून राहण्याचा नैतिक अधिकार नसल्यामुळे या आदिवासी विरोधी आमदाराची आमदारकी रद्द करण्यासंबंधीची शिफारस विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे करण्यात यावी आणि त्यांचे विधानसभा सदस्यत्व कायमस्वरुपी रद्द करण्यात यावे, अशी मागणी मतीन भोसले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.