नागपूर : डॉलीच्या टपरीवर चहाचे झुरके मारताना गिट्टीखदान पोलिसांच्या हाती लागलेल्या लुटेरी दुल्हनची सध्या नागपूरच नव्हे तर विदर्भाच खमंग चर्चा आहे. आठ जणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या या लुटेरी दुल्हनने एकट्या नागपुरात हे कारनामे केलेले नाहीत. तर त्याची व्याप्ती भोपाळ आणि छत्रपती संभाजी नगरातही विस्तारली आहे. लुटेरी दुल्हनची मोडस ऑपरेंडी पाहून पोलीसही चक्रावले आहेत. आतापर्यंत तिने आठ जणांना जो गंडा घातला त्याचा हिशेबही कोट्यवधींच्या घरात आहे.
गुलाम गौस पठाण या आठव्या नवऱ्याला गंडा घातल्यानंतर तिचे एकेक कारनामे समोर येत गेले. गुलाम गौस सोबतच फसवले गेलेले इम्रान अंसारी, नजमुम साकीब, रहेमान शेख, मिर्झा अशरफ बेग, मुदस्सीर मोमिन, मोहम्मद तारिक अनिस, अमानुल्लाह खान, गुलाम गौस पठाण असे एकेक जण पुढे आले.
अशी होती मोडस ऑपरेंडी लुटेरी दुल्हन आधी पत्नीच्या शोधात असलेल्यांना लग्नाळूंना फेसबूक, इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांवरून शोधत होती. त्यांना मेसेज पाठवून आपणही पतीच्या शोधात आहोत, आपल्यालाही समजुतदार, सुंदर जोडीदाराची गरज आहे, असे भासवत होती. फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून एकमेकांच्या फोन नंबरची आदान प्रदान व्हायची. यानंतर सुरू व्हायचा तिचा प्लान एक. जाळ्यात अडकवलेल्यांशी प्रेमाच्या गोष्टी करून ती इमोशनल ब्लॅकमेल सुरू करायची. मग हळू हळू निकाह पर्यंत गोष्टी पुढे सरकायच्या.
बनावट निकाहनामा करून ही नवऱ्यांना जाळ्यात अडकवायची. पती- पत्नीच्या नात्याने दोघांमध्ये पैशांची आदानप्रदान व्हायची. त्यानंतर सुरू व्हायचा तिचा प्लान बी. नव्याने बनवलेल्या पतीसोबत तीन – चार महिने संसार केल्यानंतर ती घरात भांडणे सुरू करायची. पती सोबतच सासच्यांना त्रास देऊन ती पैसा उकळायची. एखादा जर एकतच नसेल तर सासच्या लोकांविरोधात पोलिस ठाण्यात खोट्या तक्रारी दाखल करायची. असे अनेकांसोबत तिने केले आहे.
सेटलमेंट न झाल्यास धमक्या पोलीस ठाण्यात तक्रार करून झाल्यावर लुटेरी दुल्हन तडजोडीच्या मुद्यावर यायची. तडजोडीची रक्कम म्हणून ती लाखो रुपये पती आणि सासरच्या लोकांकडून मागायची. तडजोड न झाल्यास न्यायालयात जाऊन पोटगी आणि निर्वाह भत्ता देखील तिने मागिलता आहे. लुटेरी दुल्हनच्या अशा अनेक केसेसच्या सुनावण्या कौटुंबिक न्यायालयात सुरू आहेत.
छत्रपती संभाजी नगरातला असाच एक पती तारिक अनिसने तिच्या विरोधात मानकापूर पोलिस ठाण्यात तर मुदस्सीरने जरीपटका पोलिस ठाण्यात लुटेरी दुल्हन विरोधात तक्रारी केल्या आहेत. पवनीचा अमानुल्लाह खान यानेही लुटेरी दुल्हन विरोधात पाचपावली पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.