लोकसत्ता टीम

वर्धा: दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ संचालित सावंगी मेघे येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात सातत्याने नवीन तंत्रज्ञानाची भर पडत असून आता रोबोटिक असिस्टेड सर्जरी म्हणजेच रोबोटिक उपकरणांच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सर्जिकल रोबोट कार्यान्वित करीत यशस्वी रोबोटिक सहाय्यक शस्त्रक्रिया करणारे मध्यभारतातील हे पहिले वैद्यकीय महाविद्यालय आहे.

गत आठवड्यात सावंगी मेघे रुग्णालयाच्या सुसज्ज शल्यक्रियागृह अद्यावत सर्जिकल रोबोट यंत्रणा स्थापित करण्यात आली. तत्पूर्वी, सावंगी रुग्णालयातील सात शल्यचिकित्सक आणि तीन परिचारिकांनी गोवा येथील सीएमआर सर्जिकल येथे रोबोटिक असिस्टेड सर्जरीचे प्रशिक्षण पूर्ण केले. शल्यक्रियागृहात ४५ वर्षीय स्त्री रुग्णाच्या शरीरातून पित्ताशय विलग करण्याची शस्त्रक्रिया रोबोटिक उपकरणांच्या सहाय्याने करण्यात आली. या शस्त्रक्रियेत मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर यांनी डॉ. यशवंत लामतुरे व डॉ. शिवानी क्षीरसागर यांच्या सहकार्याने पूर्णत्वाला नेली. तर, दुसरी ४९ वर्षीय रुग्णाच्या नाभीसंबंधीची हर्निओप्लास्टी रोबोटिक शस्त्रक्रिया डॉ. यशवंत लामतुरे यांच्यासह डॉ. राजू शिंदे, डॉ. जय धरमशी, डॉ. स्वाती देशपांडे व डॉ. संजीव ग्यानचंदानी यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली. या दोन्ही शस्त्रक्रियेत प्रशिक्षित परिचारिकांच्या चमूचे सहकार्य लाभले.

आणखी वाचा-वडील डॉक्टर, भाऊ वैमानिक, पण… मानसिक आजारी तरुण दोन वर्षांनी घरी कसा पोहचला पहा…

शस्त्रक्रियांपूर्वी या नाविन्यपूर्ण सुविधेचे अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी आयोजित ऑनलाईन समारोहाला प्रकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्रधान सल्लागार सागर मेघे, प्रकुलगुरू डॉ. गौरव मिश्रा, प्रशासकीय महासंचालक डॉ. राजीव बोरले, मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव, कुलसचिव डॉ. श्वेता काळे पिसूळकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय गायधने, विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, संचालक डॉ. अभय मुडे, वानाडोंगरी येथील शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनुप मरार यांची उपस्थिती होती.

रोबोटिक असिस्टेड सर्जरी काय आहे?

गेल्या काही वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात आलेल्या महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानापैकी एक म्हणजे रोबोटिक शस्त्रक्रिया होय. रोबोटिक असिस्टेड सर्जरी ही रोबोट म्हणजे यंत्रमानवाद्वारे केली जाते, असा अनेकांचा गैरसमज असतो. वस्तुतः रीतसर प्रशिक्षण घेतलेले तज्ज्ञ शल्यचिकित्सक रोबोटिक उपकरणांच्या, तंत्रज्ञान व संगणकीय प्रणालीच्या सहाय्याने या शस्त्रक्रिया करीत असतात. रोबोटिक शस्त्रक्रिया ही एक प्रकारची मिनिमली इनवेसिव्ह शस्त्रक्रिया आहे. रोबोटिक उपकरणे वापरून उपचार करण्यासाठी शल्यचिकित्सक शरीरात लहान चिरे देतात आणि त्यातून लहानसे उपकरण व हाय-डेफिनिशन कॅमेरा आत सोडून प्रक्रिया सुरू केली जाते. काही उपचारात त्वचेला चिरा देण्याची गरज नसते. त्यानंतर, जवळच्या कन्सोलमधून शल्यचिकित्सक त्या उपकरणांना संचालित करतो. या प्रणालीतून शल्यचिकित्सकाला स्पष्ट आणि अचूक दृश्य प्राप्त होऊन कौशल्यपूर्ण उपचार करणे शक्य होते. रोबोटिक असिस्टेड सर्जरीमुळे रुग्णाला कमीतकमी दुखापत व वेदना होत असून रुग्ण लवकर पूर्ववत होण्यास मदत होते. या आधुनिक प्रणालीत वेळ, श्रम आणि पैशांची बचत होत असून उपचारांबाबत अधिक सुनिश्चितता आहे.

आणखी वाचा- तलाठी भरती : परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्राचा मालक लॅपटॉप बाहेर घेऊन गेला आणि..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणत्या शस्त्रक्रिया करण्यात येतात?

रोबोटिक असिस्टेड सर्जरी प्रणालीत विविध प्रकारच्या कर्करोग शस्त्रक्रियांसोबतच प्लास्टिक सर्जरी व पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया, फुफ्फुसाच्या शस्त्रक्रिया, पित्ताशय तसेच गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया, किडनी विलग करण्याची शस्त्रक्रिया, अपेन्डिक्स व मूत्राशयाच्या शस्त्रक्रिया, जठर व आतड्यांच्या शस्त्रक्रिया तसेच गुदाशयाच्या शस्त्रक्रिया करण्यास सध्या प्राधान्य देण्यात आले आहे. भविष्यकाळात प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे अधिक जोखमीच्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही रोबोटिक साधनांच्या सहाय्याने करण्यात येण्याची शक्यता वर्तविली जाते.