अमरावती: आमदार सदाभाऊ खोत यांनी त्यांचे ‘चॉकलेटबॉय’ मित्र गोपीचंद पडळकर यांना पाठिंबा देण्यासाठी माझ्याविरोधात वक्तव्य केलेले दिसत आहे. सदाभाऊ खोत हे नाराज आहेत. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. आपल्याला मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा खोत यांना होती. पण, त्यांनाही मंत्रिपद मिळाले नाही आणि ‘चॉकलेटबॉय’ पडळकर यांनाही संधी मिळाली नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली.
काल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक शरणू हांडे यांचे अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली. रोहित पवारांचे तोंड शिवले आहे का? असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे. त्यावर रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
रोहित पवार म्हणाले, सदाभाऊ खोत, तुम्हीच बोलला होतात, की शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करीत असताना आम्ही दुधात पाणी घालायचो, फसवणूक करायचो. आम्ही दिखावा करायचो अन रस्त्यावर आंदोलन करायचो. जो शेतकरी नेता म्हणून शेतकऱ्यांचा झाला नाही, तो लोकांचा नेता कसा काय होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही बिनबुडाचे आरोप करू नका.
तुमच्याकडे पुरावे असतील, तर तुम्ही ते द्या. आम्ही अनेक पुरावे तुम्हाला दिले आहेत. जेव्हा लोकसभेची निवडणूक सुरू होती, तेव्हा गुंड लोक हे भाजपचा, अजित पवार यांच्या पक्षाचा प्रचार करताना किंवा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना कोण भेटले होते. हे सर्व पुरावे आम्ही दिले आहेत. त्यामुळे गुंड प्रवृत्तीला कोण खतपाणी घालत आहे, हे लोकांनी प्रत्यक्ष पाहिले आहे.
रोहित पवार म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग हा सदाभाऊ खोत यांच्या गृहक्षेत्राच्या जवळूनच जात आहे. त्यांनी बाधित शेतकऱ्यांची भेट घेतली पाहिजे. आम्ही सातत्याने शक्तिपीठ महामार्गाचा विरोध करीत आहोत. एका बाजुला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आठ पदरी रस्त्याला नॅशनल हायवे ऑथिरीटीच्या माध्यमातून एका किलोमीटरसाठी ७० कोटी रुपये खर्च करतात. पण, आपले राज्य सरकार या सहा पदरी रस्त्यासाठी प्रति किलोमीटर १२० कोटी रुपये खर्च करीत असेल, तर या तफावतीचे वरचे ४० हजार कोटी रुपये कोणाच्या खिशात चालले आहेत, हे सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना सांगावे. भ्रष्टाचार कोण करीत आहे, हे पुराव्यासकट लोकांसमोर आले आहे. आम्ही तो समोर आणला म्हणून आम्हाला अडकवण्याचा कट रचला जात आहे.