लोकसत्ता टीम
नागपूर: भारताचा खरा इतिहास समोर आणावा लागेल. ही काळाची गरज आहे. एक काळ होता की, भारत वसाहतवादी मानसिकतेचा गुलाम होता. त्यामुळे अयोध्येचा खरा इतिहासही सांगितला जात नव्हता. आमच्या शिक्षकांचे अयोध्येवरील संशोधन नाकारले जात होते. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. भारताचा खरा इतिहास लोकांना सांगा, त्यासाठी समोर या, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे म्हणाले.
आणखी वाचा-‘त्या’ ट्विटमुळे अजित पवार ट्रोल, “शब्दांचे पक्के असणारे दादा तिकडे गेल्यापासून…”
नागपूर येथे अखिल भारतीय शैक्षिक महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपीय सोहळ्यात ते बोलत होते. होसबळे म्हणाले की, भारत आज बौद्धिक स्वातंत्र्याकडे जात आहे. त्यामुळे आता आम्हाला घाबरण्याची गरज नाही. वसाहतवादी मानसिकतेतून भारत बाहेर आला आहे. आता जगाला भारताचा खरा इतिहास माहिती होणे आवश्यक आहे. जग भारताकडे विश्वगुरू होण्याच्या अपेक्षेने बघतो आहे. शिक्षकांवर मोठी जबाबदारी आहे. देशाची एक पिढी ते घडवतात. त्यामुळे त्यांनी भारताचा खरा इतिहास सांगायला हवा असेही होसबळे म्हणाले.