परिवहन आयुक्तांकडून लोकसत्ताच्या वृत्ताची दखल
नागपूर : शहर प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर यांचा वाहन चालक अनिल तोमस्कर याने पाचगाव परिसरात सेवेवरील मोटार वाहन निरीक्षकाला धमकावत त्याने पकडलेल्या वाहनांना येथून पळवून लावले होते. लोकसत्ताने हा प्रकार पुढे आणल्यावर परिवहन आयुक्त कार्यालयाने गुरुवारी सायंकाळी त्याच्या निलंबनाचे आदेश काढले.
लोकसत्ताच्या वृत्तानंतर नागपूर शहर आरटीओतील अधिकाऱ्यांची आज झडती घेण्यात आली. या प्रकरणाचा अहवाल मागण्यात आला. मनवर यांनी तातडीने हा अहवाल मुंबईला पाठवला. त्यानंतर सायंकाळी नागपूरच्या आरटीओ कार्यालयात निलंबनाचा आदेश धडकला. तोमस्करने राजकीय मंडळींच्या मदतीने या प्रकरणातून निर्दोष सुटका करू नये म्हणून त्याचे मुख्यालय चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ठेवण्यात आले आहे. निलंबन कालावधीत त्याला हे मुख्यालय पूर्वपरवानगीशिवाय सोडता येणार नाही. निलंबनाच्या वृत्ताला दिनकर मनवर यांनी दुजोरा दिला.