महेश बोकडे

नागपूर : परिवहन खात्याने राज्यभरातील प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांत (आरटीओ) ६५ सिम्युलेटर (संगणक यंत्रणेवरील आभासी वाहन चालवण्याची यंत्रणा) लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी रस्ता सुरक्षा निधीतून ३ कोटी ९० लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता मिळाली आहे. या यंत्रणेमुळे  अपघातांवर नियंत्रण मिळवण्याचा परिवहन खात्याला विश्वास आहे.

राज्यात सुमारे १५ प्रादेशिक परिवहन कार्यालय तर जवळपास ३५ उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. यापैकी सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांत प्रत्येकी २ तर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांत नागपूर पूर्व कार्यालय वगळून इतरत्र प्रत्येकी १ सिम्युलेटर लावले जाणार आहे. नागपूर पूर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात २ सिम्युलेटर लागणार आहेत. हे सिम्युलेटर लावण्यासाठी सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयांत तातडीने जागा निश्चित करण्यासह संबंधित संस्थेला सर्व मदत करण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले आहेत.  तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर नागपुरातील एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयात सिम्युलेटर कक्षाचे उद्घाटन केले होते. परंतु काही तांत्रिक कारणाने ते पहिल्याच दिवशी बंद पडले. त्यानंतर अनेक वर्षे लोटल्यावरही त्याचे पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे प्रत्येक आरटीओ कार्यालयात हे सिम्युलेटर लागल्यावर त्यात काही तांत्रिक समस्या उद्भवल्यास ती तातडीने दूर करण्यासाठी परिवहन खात्याकडून काय आवश्यक खबरदारी घेतली जाणार, याकडे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे. या वृत्ताला परिवहन आयुक्त कार्यालयाने दुजोरा दिला आहे.

सिम्युलेटरवर कायम परवान्याची चाचणी?

सिम्युलेटर लागल्यावर त्यावर कायम वाहन चालवण्याचा परवाना घेण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांची परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे. सध्या एका उमेदवाराच्या वाहन चालवण्याच्या परीक्षेसाठी ३ ते ४ मिनिटांचा वेळ दिला जातो. परंतु सिम्युलेटरवर हा वेळ १५ मिनिटांच्या जवळपास वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोज २०० कायम परवाने देण्याचा कोटा असलेल्या कार्यालयांत एवढा वेळ सिम्युलेटरवर परीक्षा घेण्यासाठी मनुष्यबळ कुठून आणावे, हा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता  आहे.

असे होणार वाटप..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई सेंट्रल, मुंबई वेस्ट, मुंबई ईस्ट, ठाणे, कोल्हापूर, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, धुळे, औरंगाबाद, नांदेड, लातूर, अमरावती, नागपूर (श.), नागपूर (ग्रा.), नागपूर पूर्व या १६ आरटीओ कार्यालयांत  प्रत्येकी २ सिम्युलेटर तर बोरीवली, कल्याण, वाशी, पनवेल, पेन, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, कराड, सोलापूर, बारामती, अकलूज, अहमदनगर, श्रीरामपूर, मालेगाव, जळगाव, नंदूरबार, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, अंबेजोगाई, बुलढाणा, यवतमाळ, अकोला, वाशीम, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या कार्यालयांत  प्रत्येकी १ सिम्युलेटर मिळणार आहे.