अग्निशमन विभागाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ न घेताच वर्ग सुरू
देशातील एकमेव राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयामध्येच अग्निशमन विभागाच्या नियमांची पायमल्ली करण्यात येत असून राजनगर येथील नवीन इमारतीसाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ न घेता इमारतीमध्ये वर्गही सुरू करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अग्निशमन सेवेसंदर्भात प्रशिक्षण आणि अभ्यासक्रम चालविण्यासाठी १९५० साली देशात राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. सुरुवातील हे महाविद्यालय उत्तरप्रदेशातील रामपूर येथे होते. परंतु भौगोलिक परिस्थिती, पर्यावरण आणि इतर सुविधा विचारात घेऊन १९५६ मध्ये संस्था नागपुरात हलविण्यात आली. संस्थेचे मुख्यालय सिव्हील लाईन्स परिसरातील जिल्हा न्यायालयाच्या विरुद्ध दिशेला आहे. या ठिकाणी एकाच वेळी २०० जणांना प्रशिक्षण देण्याची क्षमता आहे.
या महाविद्यालयाला आवश्यक जागा आणि प्रात्यक्षिकांसाठी मोठय़ा जागेची आवश्यकता भासू लागली. जाफरनगर मार्गावरील राजनगर परिसरात महाविद्यालयासाठी नवीन इमारत बांधण्यात आली. या इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. या ठिकाणी शैक्षणिक वर्ग इमारत, विद्यार्थ्यांचे वसतिगृह, ग्रंथालय, खेळाचे मैदान, अतिथीगृह, व्यायाम शाळा आणि प्रात्यक्षिकांचे मैदान आदी सर्व सुविधा आहेत. अतिशय अत्याधुनिक असे हे महाविद्यालय तयार करण्यात आले असून या ठिकाणी प्रमाणपत्र, पदविका, आधुनिक पदविका अभ्यासक्रम अग्निशमन अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम चालविण्यात येतात. याशिवाय देशभरातील अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी प्रशिक्षण घेण्यात येते.
नवीन राजनगर इमारतीमध्ये गेल्या वर्षीपासून वर्ग घेण्यास सुरुवात झाली. महापालिकेच्या क्षेत्रातील इमारतींना महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक आहे. परंतु महाविद्यालयाने इमारत पूर्ण होऊनही हे प्रमाणपत्र मिळविले नाही. त्यामुळे अग्निशमन अधिकारी घडविणाऱ्या संस्थेकडून अग्निशमन विभागाच्या नियमांची पायमल्ली होत असल्याची टीका होत आहे.

गेल्यावर्षी बजावली नोटीस
महापालिकेच्या अग्निशमन विभागाने गेल्यावर्षी राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाला नोटीस बजावली होती. त्यानंतर अद्यापही महाविद्यालय किंवा संबंधित यंत्रणांकडून पाठपुरावा करण्यात आला नाही. त्यामुळे महापालिका पुन्हा नोटीस बजावणार असल्याची माहिती आहे.केंद्रीय बांधकाम विभागाची जबाबदारी राजनगर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येते. त्यामुळे इमारतीला अग्शिमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्यांच्या अंतर्गत वीज विभागाची असते. मात्र, त्यासंदर्भात आपल्याला अधिक माहिती नाही. केंद्र सरकारच्या आदेशामुळे वर्ग सुरू करण्यात आले आहेत.
– शमीम शेख, संचालक, राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय.

अद्याप आराखडा प्राप्त नाही
राजनगर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या इमारतीला अग्निशमन विभागाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महाविद्यालयाने अद्यापही आपल्याकडे आराखडा पाठविला नाही. त्यामुळे महाविद्यालयाला पुन्हा नोटीस देण्यात येईल.
– राजेंद्र उचके, मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका