अमरावती : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. सध्या शस्त्रविराम झालेला असला, तरी सीमेवर तणावाचे वातावरण कायम आहे. त्यातच अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील काही गावांमध्ये आज एक विमान जमिनीच्या जवळून घिरट्या घालताना दिसल्याने अफवांचा महापूर आला.
मोर्शी तालुक्यातील काही भागात आज एक विमान भूपृष्ठाजवळ घिरट्या घालताना दिसून आले आहे. हे विमान विमान भूपृष्ठावरील जलस्त्रोतांचे पर्यवेक्षण करणारे असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
आज सकाळी साडेसात ते आठ वाजता मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर मंडळात खेड, तळेगाव, धामणगाव आणि आष्टगाव या परिसरात आकाशातून एक विमान भूपृष्ठाजवळ घिरट्या घालताना नागरिकांना स्पष्टपणे दिसले. हे विमान जवळपास अर्धा तास या भागात घिरट्या घालत होते.
सदर विमान भूपृष्ठावरील जलस्त्रोतांचे पर्यवेक्षण करण्यासाठी यंत्रणेकडून वापरण्यात आले आहे. या विमानाद्वारे भागातील पाण्याच्या साठ्याची माहिती घेतली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी आवश्यकता भासल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
ड्रोनच्या वापरावर बंदी
पहलगाम येथील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्ह्यात ग्रामीण भागात ड्रोन आणि या प्रकारचे हवाई साधने वापरण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. हे प्रतिबंध ३१ मे पर्यंत लागू राहणार आहेत.
१० मे रोजी भारताने शस्त्रसंधीची घोषणा केली आणि ऑपरेशन सिंदूर स्थगित करण्यात आले. मात्र, दहशतवादी संघटनांनी त्यांचे भारतात असलेले गुप्त समर्थक आणि स्लीपर सेल्स सक्रिय करून सूड घेण्यासाठी घातपात घडवण्याची शक्यता आहे. यासाठी ड्रोन, रिमोट नियंत्रित मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, पॅरा मोटर, पॅरा ग्लायडर, हॅंग ग्लायडर, हॉट एअर बलून यांसारख्या साधनांचा वापर केला जाऊ शकतो, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे. त्यानुसार ३१ मे पर्यंत अमरावती ग्रामीण हद्दीत सार्वजनिक ठिकाणी ड्रोन, रिमोट नियंत्रित मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, पॅरा मोटर, पॅरा ग्लायडर, हॅंग ग्लायडर, हॉट एअर बलून यांसारखी साधने जवळ बाळगण्यास व वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.