फुटाळा तलावावर मगर असल्याच्या समाज माध्यमावरील वृत्ताने खळबळ
‘लांडगा आला रे आला’ ही गोष्ट लहानपणी सर्वानीच ऐकली आहे. लांडगा आला म्हणून कुणीतरी खोडी काढायची आणि मग अख्खे गाव जागे व्हायचे. प्रत्यक्षात जेव्हा लांडगा आला तेव्हा एकही गावकरी धावला नाही आणि खोडी काढणाऱ्याची मात्र फजिती झाली. नागपुरातही असाच काहीसा प्रकार मंगळवारी घडला. नागपूरची चौपाटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि नागपूरकरांचे पर्यटनाचे आवडीचे ठिकाण असणाऱ्या फुटाळा तलावावर मगर फिरत असल्याचे वृत्त छायाचित्रासह समाज माध्यमावर (सोशल मीडिया) पसरले. हे वृत्त खोटे असल्याचे वन्यजीवप्रेमींनी आटोकाट सांगण्याचा प्रयत्न केल्यानंतरही हा प्रकार दुसऱ्या दिवशीही तसाच सुरू राहिल्याने या प्रकारावर वन्यजीवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
समाज माध्यमाचा वापर कसा करायचा हे अजूनही लोकांना कळलेले नाही हे या प्रकाराने पुन्हा एकदा दाखवून दिले. काहीही, कसेही आणि घटना किंवा त्या छायाचित्राची सत्यता न तपासता ते समाज माध्यमावर पोस्ट करण्याचा प्रकार हल्ली वाढत चालला आहे. त्याच्या भविष्यातील परिणामाचा कुणीही विचार करत नाही. मंगळवार सायंकाळपासून व्हॉट्सअॅप, फेसबुक या समाज माध्यमांवर नागपूर शहरातील फुटाळा तलावावर मगर फिरत असल्याचे वृत्त छायाचित्रासह कुणीतरी पोस्ट केले आणि अवघ्या थोडावेळात हा प्रकार पसरला. ही पोस्ट समोर सरकवणाऱ्यांनी घटनेची सत्यता तपासली नाही आणि त्याच्या परिणामाची विचार केला नाही. ‘व्हॉट्सअप’च्या अनेक समूहावर ते पोस्ट झाले आणि वन्यजीवप्रेमींनी हा सर्व प्रकार खोटा असल्याचे सांगूनही ती पोस्ट समोर सरकत राहिली. विशेष म्हणजे फेसबुकवर ज्यांनी ही पोस्ट टाकली, त्यात काही स्वत:ला वन्यजीवप्रेमी म्हणवणारेही आहेत. नागपुरातील फुटाळा तलाव म्हणजे पर्यटकांचे आवडते ठिकाण आणि त्यातही पावसाळ्यात याठिकाणी तरुणाईच नव्हे तर सर्वच वयोगटातील लोक फिरायला येतात. त्यामुळे हे वृत्त फुटाळा परिसरात असणाऱ्या एखाद्या पर्यटकांच्या हाती लागले असते, तर गर्दीच्या या ठिकाणी गोंधळ उडाला असता. पावसाळ्यात तसेही याठिकाणची गर्दी आवाक्यात आणणे हे पोलिसांच्याही हातात नसते. अशावेळी याठिकाणी मगर असल्याचे वृत्त पसरले असते तर धावपळ आणि चेंगराचेंगरीसारखा प्रकारसुद्धा घडू शकला असता.
वन्यजीव विभागाकडे यासंदर्भात कुणीही तक्रार केली नसल्याचे मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी सांगितले. तर पक्षी अभ्यासक अविनाश लोंढे यांनीही या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकारासंदर्भात अनेकांनी विचारणा केल्याचे त्यांनी सांगितले. हा विषय सार्वजनिक जागेशी निगडीत असल्याने काहीही होऊ शकले असते. अशी काही घटना घडली तर वन्यजीव विभागाचे कर्मचारी आणि वन्यजीवतज्ज्ञसुद्धा धावून जातात. मात्र, असे खोटे वृत्त पसरत असेल आणि एखादेवेळी खरोखरच ती घटना घडली असले तर मदतीसाठी जाताना कुणीही दहावेळा विचार करेल. मदतीची गरज असतानाही ती मदत वन्यजीवांना मिळू शकणार नाही. त्यामुळे घटनेची सत्यता तपासा आणि नंतरच समाज माध्यमावर द्या, असे आवाहन त्यांनी केले.