वर्धा : राष्ट्रीय, राज्य व जिल्हा मार्ग म्हणून देशातील रस्त्यांची ओळख आहे. त्यांना नंबर पण देत ही ओळख निश्चित करण्यात आली आहे. त्या नंबर नुसार रस्त्यावरील घटनेची माहिती दिल्या जात असते. पण ग्रामीण भागातील रस्त्यांना अशी ओळख अद्याप मिळालेली नाही. गावाच्या नावेच रस्त्यांची माहिती दिल्या जात असते. नंबर नसल्याने कोणत्या रस्त्यावर काय घडले किंवा वाद कुठे झाला, हे निश्चित होत नाही तसेच मालकी खाजगी की शासकीय हे पण कोडेच असते. त्यामुळे अश्या रस्त्यांवर अतिक्रमण पण झालेले शासनास दिसून आले आहे. ते टाळावे म्हणून शासनाने या ग्रामीण भागातील रस्त्यांना क्रमांक देण्याची तयारी सूरू केली आहे.

महसूल खात्याने तसा आदेश काढून प्रसंगी पोलीस खात्याची मदत घेत वाद दूर करीत रस्ते मर्यादा निश्चित करण्याचे ठरविले आहे. ग्रामीण भागात ग्रामीण, हद्दीचे, गाडीमार्ग, पायमार्ग, पांदण व शेतमार्ग असे रस्त्यांचे प्रकार आहेत. पण वेळोवेळी झालेल्या नवीन रस्त्यांच्या नोदी झाल्या नसल्याने वापर करण्याच्या व अतिक्रमण झाल्याच्या राज्यभर तक्रारी होत असतात.

हे लक्षात घेऊन शासनाने या रस्त्यांचे मापन करीत त्यास सांकेतिक क्रमांक म्हणजेच नंबरदार करण्याचे ठरविले आहे. राज्यात सर्वेक्षणाचे मूळ काम १८९० ते १९३० या कालावधीत झाले. ग्रामीण गाडीमार्ग व पायरस्ते असे हे प्रकार. त्यावेळी मोजणी करीत ग्राम नकाशे करण्यात आले. त्यात हे दोन प्रकारचे रस्ते नमूद झाले. मात्र रस्त्याची जमीन भुमापन नोंदीत नाही. आता ग्रामसभेमर्फत मोजमाप सूरू होणार. अतिक्रमण दूर करीत भूमी अभिलेख कार्यालयात सार्वजनिक रस्ता अशी नोंद केल्या जाईल.

१८९० च्या मूळ सर्वेक्षणातील नोंदी तलाठी अभिलेखात नाही. म्हणून सर्व प्रकारच्या रस्त्यांच्या नोंदी लांबी रुंदीसह घेतल्या जाण्याची कार्यवाही केल्या जाईल. सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामीण विकास विभागाच्या रस्त्यांची नोंद व सांकेतिक क्रमांक आहे तेच राहणार. उर्वरित गाडीमार्ग, पायमार्ग, हद्दीचे व अन्य रस्त्यांना कोड देण्यात येणार आहे.

दोन, तीन अंकी तसेच एक अंकी इंग्रजी वर्णक्षर याप्रमाणे हे सांकेतिक म्हणजेच कोड ठरतील. अनेक पायरस्ते व गाडीमार्ग नव्याने अस्तित्वात आलेत. त्यांच्या नोंदी मूळ सर्वेक्षणात झालेल्या नाहीत.आता या सर्व रस्त्यांच्या नोंदी करण्याचे काम तलाठी, कोतवाल, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांच्या मदतीने तहसीलदार मार्गदर्शनात होणार. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सेवाग्राम भाजप मेळाव्यात या पांधण रस्त्याबाबत मुद्दा मांडला होता. तसेच येत्या पाच वर्षात हे सर्व रस्ते पूर्ण करण्याची हमी दिली होती.