नागपूर : व्याघ्रप्रकल्पातील सफारी सर्वसामान्यांसाठी कधीच परवडणारी नव्हती. त्यानंतरही केवळ व्याघ्रदर्शनासाठी म्हणून कसेबसे पैसे जमवून हे सर्वसामान्य नागरिक ताडोबात येत होते. मात्र, आता पुन्हा ही सफारी महागली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील बफरच नाही तर गाभा क्षेत्रातही सफारी करणाऱ्या पर्यटकांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाने जागतिक पर्यटन नकाशावर नाव कोरले आहेत. भारतातीलच नाही तर भारताबाहेरील पर्यटकांसाठी हा व्याघ्रप्रकल्प पहिली पसंती आहे. यात ‘सेलिब्रिटी’चा समावेश देखील आहे. सहज होणाऱ्या व्याघ्रदर्शनामुळे वन्यजीव छायाचित्रकारांची देखील गर्दी या व्याघ्रप्रकल्पात होते. मात्र, आता या व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातच नाही तर बफर क्षेत्रातदेखील सफारी करणाऱ्या पर्यटकांना हजार रुपये अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील पर्यटनाच्या नव्या दरपत्रकानुसार आता गाभा क्षेत्रात पर्यटनासाठी आठ हजार ८०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर सुटीच्या दिवशी म्हणजेच शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी १२ हजार ८०० रुपये सफारीसाठी मोजावे लागणार आहेत. सफारीच्या एक ते ५९ दिवसाआधी पर्यटनासाठी नोंदणी केल्यास आठवड्याच्या दिवशी पाच हजार ८०० रुपये आणि आठवड्याच्या शेवटी सहा हजार ८०० रुपये इतका खर्च येणार आहे. येत्या एक जुलैपासून ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील पर्यटन तीन महिने बंद असणार आहे. त्यानंतर एक ऑक्टोबरला पर्यटकांसाठी गाभा क्षेत्रातील सफारी सुरू होणार आहे. त्यानंतरच हे नवे दर लागू होणार आहेत. दरम्यान, बफर क्षेत्रातील पर्यटन शुल्कात देखील वाढ झाली असून येत्या एक जुलैपासूनच ही दरवाढ लागू होणार आहे. सहा हजार रुपये त्यासाठी आकारण्यात येणर आहेत. तर आठवड्याच्या शेवटी शनिवार आणि रविवारी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सात हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या ‘मायताडोबा’ या संकेतस्थळावर देखील हे नवे दर प्रदर्शित करण्यात आले आहेत.
गाभा एक जुलैपासून बंद
येत्या एक जुलैपासून पावसाळ्यात गाभा क्षेत्र पर्यटनासाठी बंद राहणार आहेत. तर एक ऑक्टोबरपासून पुन्हा ते खुले होणार आहेत. यादरम्यान बफर क्षेत्रातील आगरझरी, देवाडा, जुनोना, कोलारा चौरदेव, बेलारा, अलिझंझा, नवेगाव बफर हे क्षेत्र पर्यटनासाठी खुले राहणार आहे, असे ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांनी कळवले आहे.