९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान मराठवाडय़ातील उस्मानाबादला मिळाला. आता पाठोपाठ संमेलनाध्यक्षपदाचा बहुमानही मराठवाडय़ालाच मिळणार, असे संकेत आहेत.
ज्येष्ठ विचारवंत व लेखक न्या. नरेंद्र चपळगावकर, निसर्गकवी ना. धों. महानोर व ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्यापैकी एका नावावरच शिक्कामोर्तब होईल, हे आता स्पष्ट झाले आहे.
साहित्य महामंडळाची सूत्रे मराठवाडा साहित्य परिषदेकडे आली तेव्हाच यंदाचे संमेलन मराठवाडय़ाला मिळणार, अशी चर्चा होती आणि झालेही तसेच. फ. मु. शिंदे यांचा एक अपवाद सोडला तर गेल्या काही वर्षांत साहित्य संमेलनाध्यक्षपदाचा मान मराठवाडय़ाला लाभलेला नाही. आता संमेलन मराठवाडय़ात होते आहे तर वाङ्मयीन गुणवत्तेच्या आधारावर संमेलनाध्यक्षही मराठवाडय़ातलाच असावा, असा एक सूर व्यक्त होत आहे. त्याची दखल घेऊनच न्या. चपळगावकर, महानोर, रसाळ यांची नावे समोर आली आहेत. यातले नरेंद्र चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश असून संवेदनशील, सत्त्वशील व ठाम भूमिका घेऊन लिहिणारे लेखक आहेत. त्यांच्या नावावर समाजाला दिशा देणारी मोठी ग्रंथसंपदा आहे.
या क्रमातले दुसरे संभाव्य उमेदवार ना. धों. महानोर यांनी मराठी काव्यविश्वात निसर्गकवी म्हणून महत्त्वाचे स्थान प्राप्त केले आहे. गेल्या १९-२० वर्षांपासून महानोर आपल्या अंतरात्म्यातील मंत्राक्षरे कवितेच्या रूपात वाचकांपुढे मांडत आहेत.
डॉ. सुधीर रसाळ हे मराठीतील सुप्रसिद्ध समीक्षक आहेत. त्यांनी दिल्लीच्या साहित्य अकादमीमध्ये मराठीचे प्रतिनिधित्व केले आहे. इ.स. १९५६ पासून ते मराठी वाङ्मयाची समीक्षा करीत आहेत. साहित्यविषयक लेखन, समीक्षा लेखन आणि संपादनात त्यांचा विशेष हातखंडा आहे.
विशेष म्हणजे, हे तिन्ही शब्दप्रभू मराठवाडय़ाचे सुपुत्र असून त्यांचा या ना त्या माध्यमातून मराठवाडा साहित्य परिषदेशी नेहमीच संबंध आला आहे. या तिघांचेही वाङ्मयीन क्षेत्रातील योगदान मोठे अन् वादातीत आहे. त्यामुळे यातल्या एकाच्या नावाला आपला कौल देताना मसापची कसोटी लागणार, हे निश्चित आहे.
न्या. चपळगावकरांचे पारडे जड
मराठवाडा साहित्य परिषदेच्या उभारणीत लक्षणीय योगदान देणाऱ्यांमध्ये न्या. चपळगावकरांचे नाव आजही आदराने घेतले जाते. तरुण वयातच ते मसापशी जोडले गेले. १५ वर्षांहून अधिक काळ ते विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष होते. साहित्य महामंडळावरही त्यांनी मसापचे प्रतिनिधित्व केले. त्यामुळे अर्थातच मसापचे पहिले प्राधान्य न्या. चपळगावकरांना राहील, असे संकेत आहेत. शिवाय विदर्भ साहित्य संघही न्या. चपळगावकरांच्या बाबतीत अनुकूल असल्याने संमेलनाध्यक्षपदासाठी त्यांचेच पारडे जड असल्याचे चित्र आहे.
मुंबई, पुण्याच्या भूमिकेकडे लक्ष
गेल्या वर्षी महामंडळ विदर्भात व संमेलनही विदर्भात असताना पहिल्या सर्वसंमतीने निवडलेल्या संमेलनाध्यक्ष या डॉ. अरुणा ढेरे याच व्हाव्या, यासाठी पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता यंदा हा मान मराठवाडय़ाला देताना महाराष्ट्र साहित्य परिषद व मुंबईची मुंबई मराठी साहित्य परिषद नेमकी काय भूमिका घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.