नागपूर : १९ एप्रिल रोजी जिल्ह्यातील दोन मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्जांची विक्री जोरात सुरू असून त्या तुलनेत दाखल होणाऱ्या अर्जांचे प्रमाण मात्र नगण्य आहे. काही संघटनांनी इलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारे मतदानास विरोध केला आहे. मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी केली आहे. चारशेहून अधिक अर्ज आले तर इलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारे मतदान घेणे अवघड होते असे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर लोकसभेसाठी अर्ज विक्री वाढणे महत्त्वाचे ठरते.

नागपूरमध्ये शुक्रवारी तब्बल १३१ अर्ज खरेदी करण्यात आले. यातील तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. रामटेकमध्ये १०४ अर्जांची विक्री झाली, फक्त एका उमेदवाराने अर्ज दाखल केला.

हेही वाचा – घड्याळ चिन्हाबाबत न्यायालयाच्या अटींचा नागपूर राष्ट्रवादीला विसर

बुधवारपासून निवडणूक अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तीन दिवसात दोन्ही मतदारसंघात इच्छुकांकडून मोठ्या संख्येत अर्ज खरेदी केली जात आहे. नागपूर मतदारसंघात २० मार्च रोजी ८२, २१ ला ५९ तर २२ मार्चला १३१ असे आतापर्यंत एकूण २७२ अर्जांची विक्री झाली. रामटेकसाठी २०ला २८, २१ला ३१ तर २२ ला १०४ अशा आतापर्यंत एकूण १६३ अर्जांची विक्री झाली. गडचिरोली-चिमूर मतदारसंघात तीन दिवसात ७५, चंद्रपूरमध्ये ४६, भंडारा-गोंदियामध्ये १५१ अर्जांची विक्री झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यात नारायण चौधरी (सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया, कम्युनिस्ट), साहिल तुरकर (अपक्ष) आणि दीपक मस्के (बहुजन महापार्टी) यांचा समावेश आहे. आतापर्यंत दाखल अर्जांची संख्या पाच तर विक्री झालेल्या अर्जांची संख्या २७५ इतकी आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी एका उमेदवाराने अर्ज दाखल केला. त्यांचे नाव प्रमोद खोब्रागडे (आंबेडकराईट पार्टी आफ इंडिया) आहे.

हेही वाचा – “मामाला तिकीट देत नसाल तर मला द्या”, खासदाराच्या भाच्याचा थेट मुख्यमंत्र्यांनाच प्रस्ताव…

ईव्हीएमला विरोध करणाऱ्या स्वयंसेवी संघटनेने अधिकाधिक अर्ज भरण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे तर अर्ज खरेदी वाढली नसावी ना, अशी चर्चा आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २७ मार्च आहे.