यवतमाळ : मारेगाव तालुक्यात कोसारा वाळू घाटावर सुरू असलेल्या अवैध तस्करीवर कारवाईसाठी गेलेल्या एका पोलीस पाटील आणि कोतवालाच्या अंगावर वाळू तस्करांनी थेट ट्रॅक्टर चढवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना आज सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रेमदास गाणार (पोलीस पाटील) व दिलीप पचारे (कोतवाल) अशी हल्ल्यात जखमींची नावे आहेत.
मारेगाव तालुक्यातील बहुतांश वाळू घाटांचा अद्याप लिलाव झालेला नाही. याचाच फायदा घेत वाळू तस्करांनी तालुक्यात डोके वर काढले असून, रात्र-दिवस मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू आहे. या तस्करांवर करडी नजर ठेवून कारवाई करण्याच्या उद्देशाने, येथील पोलीस पाटील प्रेमदास गाणार व कोतवाल दिलीप पचारे हे सोमवारी पहाटेच्या वेळी दुचाकीने कोसारा घाटावर गस्त घालण्यासाठी गेले होते. घाटावर त्यांना एक अनोळखी ट्रॅक्टर वाळूचा भरणा करीत असल्याचे दिसून आले. त्यांनी या अवैध वाहतुकीला रोखण्याचा प्रयत्न करताच, ट्रॅक्टर चालकाने अत्यंत निर्घृणपणे थेट या दोघांच्या अंगावर ट्रॅक्टर चढविला. या हल्ल्यात प्रेमदास गाणार आणि दिलीप पचारे हे दोघेही गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात त्यांच्या दुचाकीचाही अक्षरशः चुराडा झाला. या जीवघेण्या हल्ल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली नव्हती.
नेर येथे वाळू तस्करीच्या ट्रॅक्टरने दोघांना चिरडले
नेर येथे माणिकवाडा मार्गावर एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघात एक युवक जागीच ठार झाला, तर अन्य युवकाचा उपचारासाठी नागपूर येथे नेत असताना वाटेत मृत्यू झाला. विलास किसन घावडे (२८) व अर्पित रमेश मांगळे (२६) दोघेही रा. मांगलादेवी अशी मृतांची नावे आहेत. ही घटना रविवारी रात्री ८ वाजाताच्या सुमारास घडली. या घटनेने संतप्त झालेल्या जमावाने आज सोमवारी दुपारी नेर पोलीस ठाण्यास सहा तास घेराव घातला.
विलास घावडे व अर्पित मांगळे दोघेही मजुरीकरिता नेर येथे आले होते. दिवसभराचे काम आटपून नेरवरून गावाकडे परत जात असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरने हा अपघात घडल्याचा आरोप आहे. रेती तस्करी करताना पकडलेला ट्रॅक्टर नेर पोलीस ठाण्यात आणत असताना हा अपघात घडल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. घटनास्थळाचा पंचनामा न करता हा ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात कोणी आणला, असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला. गावाकऱ्यांनी या प्रकरणी नेर पोलिसांना जबाबदार धरत प्रश्नांची सरबत्ती केली. नेर पोलीस आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप आहे. दुपारपर्यंत नागरिकांनी पोलीस ठाण्यास घेराव घातला. पोलिसांनी सहकार्य न केल्याने अखेर यवतमाळ – अमरावती मार्गावर चक्काजाम आंदोलन केले. अखेर फिरत्या न्यायिक वैद्यकिय प्रयोगशाळा पथकास पाचरण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळी रक्ताचे, केसांचे नमुने गोळा केले. सायंकाळी उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
