- अधिकाऱ्यांच्या संगनमताने अभी इंजिनिअरिंगचा कारभार
- पोलीस उपायुक्तांनी साठा पकडला होता
वाळूचे घाट बंद असताना कामठी तालुक्यात मोठय़ा प्रमाणात शेकडो ब्रास वाळूचा साठा सापडल्याने प्रशासनाच्या भुवया उंचावल्या आहेत. महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा गोरखधंदा सुरू असून महसूल व स्थानिक पोलीस विभागाचे अधिकारी कागदी घोडे नाचवून कारवाईला बगल देत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
कामठीमध्ये मोठय़ा प्रमाणात कोळसा चोरीचा प्रकार चालत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने १० फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध केले. त्यानंतर परिमंडळ-५ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी कामठी-नेरी मार्गावर २१ फेब्रुवारीला सकाळी सोनू राजू हाटे, दिलीप अशोक दोडगे, इरफान पठाण खलील पठाण, राजकुमार शंकर ठाकूर, मनोज राजकुमार कनोजे आणि शंकर रमेश बागडे यांना कोळसा चोरी, साठवणूक व वाहतूक प्रकरणात रंगेहात पकडले. त्या कारवाईनंतर ते समोर जात असताना काही अंतरावर रस्त्याच्या कडेला प्रचंड मोठय़ा प्रमाणात वाळू साठवलेली दिसली. बावचे यांना संशय आला. त्यांनी गाडी थांबवून वाळूचा साठा कुणाचा आहे, याची चौकशी केली. त्यावेळी ती वाळू अभी इंजिनिअरिंग नावाच्या फर्मची असल्याचे समजले. उपायुक्तांनी कामठी पोलीस ठाण्याच्या माध्यमातून महसूल विभागाशी संपर्क केला. तेव्हा एक मंडळ अधिकारी घटनास्थळी दाखल झाला. मंडळ अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची ग्वाही दिल्यानंतर उपायुक्त परत कार्यालयाच्या दिशेने निघाले.
त्यानंतर महसूल विभागाने संबंधित वाळू साठवणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली नाही. ती वाळू ताजी होती आणि नुकतेच उत्खनन करून आणलेली असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले.
दरम्यान, सप्टेंबर २०१७ पर्यंत परिसरात केवळ एकच वाळू उत्खनन घाट सुरू होते. त्यानंतर तो एकमेव वाळू घाटही बंद करण्यात आला. शिवाय त्या ठिकाणी सापडलेली वाळू १०० ते २०० ब्रास होती. इतक्या मोठय़ा प्रमाणात वाळू कुठून आली, त्याच्यावर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही, याची उत्तरे अद्यापही प्रशासनाकडे नाहीत. त्यामुळे कामठी भागात महसूल अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या संगनमताने अवैधपणे वाळू उत्खननाचा गोरखधंदा सुरू असल्याच्या चर्चेला पेव फुटले आहे. यासंदर्भात अभी इंजिनिअरिंग फर्मचे संचालक संजय विजयवर्गी यांच्याशी संपर्क साधलाा असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
जिल्हा खाण अधिकाऱ्यांना माहिती दिली
ही वाळू १०० ब्रास असून अभी इंजिनिअरिंगने त्यासंदर्भात रॉयल्टी पावत्या सादर केलेल्या आहेत. घाट सुरू नसताना त्यांच्याकडील पावत्यांची पडताळणी करण्यासाठी जिल्हा खाण अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. जिल्हा खाण अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. सध्या वाळू जप्त करून हमीपत्रावर संबंधिताला देण्यात आली आहे.
महसूल विभागाकडून तक्रार नाही
रस्त्याच्या कडेला असलेला वाळूचा प्रचंड साठा लक्षात आल्यानंतर पोलिसांनी महसूल विभागाला माहिती दिली. ही वाळू अवैध असल्यास महसूल अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार करायला हवी. मात्र, अद्यापही महसूल विभागाकडून तक्रार प्राप्त न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
– ललित वर्टीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवीन कामठी
