शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था अतिशय नाजूक असून सर्वत्र नागवला जात असलेला शेतकरी आत्महत्या करत आहे. हा संदेश सरकापर्यंत पोहचावा म्हणून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची अस्थी व रक्षा कलश घेऊन यात्रेला निघालेल्या शेतकऱ्याला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यास मज्जाव करून असंवेदनशीलतेचे दर्शन घडवले.
सांगलीतील शेतकरी विजय जाधव हे रविवारी गडकरी यांना भेटण्यासाठी नागपुरातील निवासस्थानी गेले, परंतु गडकरी यांच्या स्वीय सचिवाने जाधव यांना भेटू दिले नाही. जाधव सकाळी ६ वाजता गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि रस्त्यावर बसून गडकरी यांना भेटण्याची वाट पाहत होते. सुरक्षा रक्षकांनी सकाळी ९ वाजताच्या सुमारास चौकशी केली आणि स्वीय सहायकांना भेटण्याची सूचना केली. गडकरी घरी नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. साहेब घरी आहेत, मला भेटू द्या, अशी विनंती शेतकऱ्याने केली. परंतु मला बाहेर सांगण्यात आले, असे संदेश यात्रेवर निघालेले शेतकरी विजय जाधव यांनी सांगितले. राज्यातील शेतकरी संकटात असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे. संकटग्रस्त शेतक ऱ्यांचे दु:ख राज्यातील मंत्र्यांनी ऐकून कर्जमाफी द्यावी, या उद्देशाने विजय जाधव यांनी ६ मे रोजी कोल्हापूर ते नागपूर अशी शेतकरी आत्महत्या अस्थी कलश यात्रा सुरू केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी सरकार काहीच करीत नसल्यामुळे मंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन ठिय्या आंदोलन करायचे आणि त्यांच्याशी चर्चा करून शेतक ऱ्यांच्या समस्या मांडायच्या हा जाधव यांच्या यात्रेचा उद्देश आहे.
गडकरी शनिवारी रात्री उशिरा नागपुरात आले. त्यामुळे सकाळी कोणालाही भेटण्यास पाठवू नका, अशा सूचना त्यांनी कार्यालयीन कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या. हीच बाब जाधव यांनाही सांगण्यात आली व त्यांचे निवेदन स्वीकारण्यात आले, असे गडकरी यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.
गडकरी साहेब घरीच होते, परंतु ते घरी नसल्याचे त्यांचे स्वीय सहायक सांगत होते. मला गडकरी यांना भेटू दिले नाही. आतापर्यंत मंत्री शिव्या देत होते. त्याचे स्वीय सहायक शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे अस्थीकलश आणि मला मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध करतो.
– विजय जाधव, शेतकरी