शहरातील कुठल्याही भागात कचरा पडलेला असेल आणि अस्वच्छतेबाबत नागरिकांच्या काही तक्रारी असतील तर महापालिकेने नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने स्वच्छता अ‍ॅप तयार केले आहे. मात्र, या अ‍ॅपवर केल्या जात असलेल्या तक्रारीचा दोन ते तीन दिवस निपटारा होत नसल्याचे आढळून आले आहे.

देशभरातील स्वच्छ शहरांच्या मानांकनात नागपूर माघारल्याने यावर्षी पहिल्या दहा शहरांमध्ये नागपूरचा क्रमांक यावा, यासाठी महापालिकेच्यावतीने शहर स्वच्छतेबाबत विविध योजना हाती घेण्यात आल्या. शहराच्या कुठल्या भागात कचरा पडला आहे, याची माहिती तात्काळ मिळावी म्हणून महापालिकेने स्वच्छता ‘अ‍ॅप’ तयार केले.

जास्तीत जास्त नागरिकांनी तो ‘डाऊनलोड’ करावा म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून शहरात जनजागृती केली जात आहे. नगरसेवक, पदाधिकारी आणि विविध सामाजिक संघटना नागरिकांना अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी आवाहन करीत आहे. विविध वस्त्यांमध्ये स्वच्छतेबाबत तक्रारी असतील किंवा घरासमोर कचरा पडलेला असेल तर नागरिकांनी महापालिकेच्या कार्यालयात जाऊन तक्रार करण्याऐवजी मोबाईलद्वारे त्याचे छायाचित्र काढून ते अ‍ॅपवर टाकायचे, त्याद्वारे महापालिकेच्या आरोग्य विभागाला माहिती मिळेल व कचरा उचलला जाईल, असे नियोजन होते. त्यामुळे हजारो नागरिकांनी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड केला. परिसरातील कचऱ्याचे छायाचित्र त्यावर टाकले. मात्र, अनेक दिवस त्याची दखलच घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे.

दररोज हजारो तक्रारी येतात, त्या तुलनेत त्याचा निपटारा करणारी यंत्रणा दुबळी आहे. एखादी योजना राबवताना अंमलबजावणीसाठी येणाऱ्या अडचणींबाबत विचार न केल्याने त्याचे वाटोळे होते. याचा प्रत्यय आता स्वच्छता अ‍ॅपच्या माध्यमातून येत आहे. यापूर्वी महापालिकेने असा प्रयोग केला होता. तोही फसला होता.

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी स्वच्छता संदर्भात मूल्यांकन करण्यासाठी केंद्राची चमू नागपुरात येणार आहे. ही चमू शहरातील विविध भागात फिरणार आणि नागरिकांशी संवाद साधणार आहे. महापालिकेने यापूर्वी स्वच्छतेसंदर्भात घरोघरी दोन कचऱ्याचे डबे (डस्टबीन) देण्याचे जाहीर केले होते. मात्र, ते सुद्धा अजूनपर्यंत विविध वस्त्यांमध्ये लोकांच्या घरात पोहचले नाही आणि डस्टबीनची योजना बारगळत असताना स्वच्छतेसंदर्भात निर्माण केलेले अ‍ॅपवरील तक्रारीचा निपटारा होत नसेल तर स्वच्छता केवळ अ‍ॅपवर राहणार की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महापालिकेचा स्वच्छता अ‍ॅपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यावर तक्रारी सुद्धा येत आहेत. त्याचा निपटारा होत नसल्याच्या तक्रारी आल्या असून यासंदर्भात माहिती घेतली जात आहे. ज्या प्रभागातील वस्त्यांमध्ये कचरा साफ केला जात नाही अशा भागातील सफाई कर्मचाऱ्यांवर आणि संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

 मनोज चाफले, आरोग्य सभापती, महापालिका