scorecardresearch

उदयनराजेंच्या राज्यपालांविरोधातील भूमिकेचे संजय गायकवाडांकडून समर्थन; म्हणाले, “शिवरायांबाबतच्या वक्तव्यांमुळे…”

आज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी रायगडावर आयोजित ‘निर्धार शिवसन्मानाचा’ या कार्यक्रमात बोलताना राज्यपालांवर परखड शब्दात टीका केली. तसेच राज्यपालांविरोधात मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याचेही ते म्हणाले.

Sanjay Gaikwad
फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफीक्स टीम

छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पदावरून हटवण्याची मागणी केली जात आहे. यावरून राज्याचे राजकीय वातावरणही तापले आहे. या विरोधात आज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी रायगडावर आयोजित ‘निर्धार शिवसन्मानाचा’ या कार्यक्रमात बोलताना राज्यपालांवर परखड शब्दात टीका केली. तसेच राज्यपालांविरोधात मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, उदयनराजे भोसले यांच्या भूमिकेचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी समर्थन केले आहे. ते बुलढाण्यात पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा – “…तर राज्यपालांचा टकमक टोकावरून कडेलोट…”, उदयनराजे भोसलेंनी मांडली आक्रमक भूमिका; रायगडावरून भाजपावरही टीकास्र!

काय म्हणाले संजय गायकवाड?

“उदयनराजे भोसले यांनी प्रतापगडावरून जी भूमिका घेतली, ती योग्य आहे. शिवरायांबाबत झालेल्या वक्तव्यांमुळे ते उद्विग्न झाले आहेत. या महाराष्ट्रासाठी महापुरुषांनी त्याग केला आहे. हिंदवी स्वराज्य स्थापन करताना अनेक वीर मावळ्यांनी बलिदान दिले आहे. अनेकांच्या बलिदानातून हा महाराष्ट्र उभा राहिला. अशा राज्याबद्दल जर कोणी बोलत असेल तर योग्य नाही. उदयनराजे आणि संभाजीराजे हे त्यांचे वारस आहेत. त्यामुळे त्यांची संतप्त प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे”, अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली आहे.

हेही वाचा – शिंदे गटाच्या आमदाराकडून शिवीगाळ, संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले, “तिथं ते शेपट्या घालत आहेत आणि…”

“राज्यपालांच्या विधानानंतर त्याविरोधात मी सर्वप्रथम भूमिका घेतली होती. त्याचे स्वागत सुप्रिया सुळे यांनीही केले होते. चूक एक-दोनदा होऊ शकते. मात्र, जाणूनबुजून कोणी शिवारांयाबाबत नको ते बोलत असेल, त्यांचा एकेरी उल्लेख करत असेल किंवा त्यांची तुलना कोणाशीही करत असेल, तर हा त्यांचा अपमान आहे. त्याबरोबरच हा देशाचा अपमान आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे कोण्या एका राज्याचे नाही, देशाचे दैवत आहेत. अशा महान महापुरुषांचा अपमान होताना उदयनराजे बघू शकत नाहीत”, असेही ते म्हणाले. दरम्यान, यावेळी तुम्ही उदयनराजेंच्या भूमिकेचे समर्थन करता का? असे विचारले असता, उदयराजेंच्या भावनांना आमचे समर्थन आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 14:30 IST
ताज्या बातम्या