नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभराव्या वर्षांकडे वाटचाल सुरू असताना संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच पद्मश्री पुरस्कार प्राप्त महिलेला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.  हरियाणातील रेवाडी जिल्ह्यातील जोनियावास गावातील ५४ वर्षीय संतोष यादव यांनी १९९२ आणि १९९३ मध्ये दोनदा एव्हरेस्ट सर केले आहे. असे करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव ५ ऑक्टोबरला रेशीमबाग संघ स्थानावर आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवाच्या निमित्ताने संघाच्या ९२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रसिद्ध गिर्यारोहक व पद्मश्री पुरस्कार प्राप्त संतोष यादव यांना आमंत्रित करण्यात आले आहे. संघाच्या विविध ३६ संघटना असून त्यात राष्ट्र सेविका समिती ही महिलांची संघटनाही आहे. संघाने कुटुंब प्रबोधन हा कार्यक्रम हाती घेतला असून तो देशभर राबवला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संघ परिवारामधील संघटनांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने संतोष यादव यांना आमंत्रित करण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

संघ परिवारातील ३६ संघटनांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने नुकत्याच झालेल्या संघाच्या समन्वय बैठकीत चर्चा झाली. संतोष यादव यांना निमंत्रित करण्यामागे संघाच्या दृष्टिकोनात बदल म्हणूनही पाहिले जात आहे. शिवाय २०२४ च्या निवडणुका बघता महिला मतदारांमध्ये आपले स्थान मजबूत करण्याच्या प्रयत्नांना जोड देण्यासाठी आणि ३३ टक्के आरक्षणासंदर्भातील विधेयक येण्याच्या पार्श्वभूमीवर संघाची ही तयारी असावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– दिलीप देवधर, संघ विश्लेषक