चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील चोरा येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू हा अतिशय दुर्दैवी असून संशयास्पद सुद्धा आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मृतक मुलीच्या आई-वडीलांकडून तसेच संबंधित यंत्रणांकडून घेतली आहे.
मृत मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अतिशय गांभीर्याने या प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर करावा, असे निर्देश अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिले.
विश्रामगृह येथे आयोजित अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पुढे ॲङ मेश्राम म्हणाले, २० मार्च २०२५ रोजी चोरा येथील अश्विनी आसुटकर या अल्पवयीन मुलीची हत्या की आत्महत्या, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. आरोपी हा २२ वर्षाचा असून त्या मुलाने तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
दुर्दैव म्हणजे याच गावात पोक्सोची दुसरी घटना घडल्याचेसुध्दा निदर्शनास आले आहे. जिल्हा प्रशासनाने अशा घटनांना तात्काळ आळा घालावा. जिल्हा प्रशासन, पोलिस विभागासह सामाजिक न्याय विभाग, महिला व बालकल्याण विभाग या विभागाने सुद्धा अशा घटकांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
आयोग म्हणून या घटनेत दिरंगाई झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते. ज्या डॉक्टरांच्या टीमने मृतक मुलीचे पोस्टमार्टम केले आहे, त्या डॉक्टरांना सुद्धा तात्काळ प्रभावाने सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच वरोराच्या उपविभागीय पोलिस अधिकारी नियोमी साटम यांनी या प्रकरणात विशेष लक्ष देऊन चांगल्या पद्धतीने तपास करावा. मृतक मुलीच्या आई-वडिलांची शंका नऊ जणांवर असून या सर्व नऊ जणांचे फोनचे चाट, सीडीआर, सोशल मीडिया आदींची तपासणी करावी.
अशा प्रकरणात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कडून ३ ते १० लक्ष रुपये मदतीची तरतूद आहे. ही तरतूद संबंधित कुटुंबाला मिळवून देण्यासाठी विभागाने प्रयत्न करावे. जिल्ह्यात एकूण पोक्सोच्या घटना किती, ॲट्रॉसिटीच्या घटना किती, याचा सविस्तर अहवाल तात्काळ सादर करावा. तसेच या संपूर्ण प्रकरणाबद्दल प्रशासनाने १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देशही ॲङ धर्मपाल मेश्राम यांनी दिले
चोरा येथे मृतक मुलीच्या घरी भेट
अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲङ धर्मपाल मेश्राम यांनी भद्रावती तालुक्यातील चोरा येथे मृतक मुलीच्या घरी भेट दिली. तसेच आई-वडिलांसोबत व आजी सोबत चर्चा करून संपूर्ण प्रकरण जाणून घेतले. यावेळी वरोराचे उपविभागीय पोलिस अधिकारी नियोमी साटम, वरोराचे उपविभागीय अधिकारी अतुल जटाळे, सहायक आयुक्त समाजकल्याण विनोद मोहतुरे, तहसीलदार भांडारकर, पोलिस निरीक्षक पारधी, आयोगाचे कायदेशीर सल्लागार ॲङ राहुल झामरे आदी उपस्थित होते.