अमरावती : राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या संकलित मूल्यमापन चाचणी-२ चे वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) जाहीर केले आहे. त्यानुसार ८ ते २५ एप्रिल या कालावधीत ही चाचणी होणार आहे. त्यामुळे राज्य मंडळाच्या सर्वच शाळांतील परीक्षा एकाच वेळी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, परीक्षा एप्रिलअखेरीस होणार असल्याने या वेळापत्रकावर आक्षेप घेण्यात आला आहे.

इतक्या उशिरा परीक्षा झाल्यास १ मे रोजी निकाल जाहीर कसा करणार, असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातून उपस्थित करण्यात येत आहे. विदर्भात उन्हाचा पारा ४५ अंशावर जातो. या तप्‍त उन्हात टिनाच्या पत्राच्या वर्गखोल्यांमध्‍ये यात एप्रिल महिन्‍यात परीक्षा ही बालकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार असून परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घेण्याची मागणी करण्‍यात आली आहे.

राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचा निकाल महाराष्ट्र दिनी (१ मे) ध्वजारोहणानंतर जाहीर करावा, २ मे पासून शाळांना उन्हाळी सुटी सुरू होईल. या सूचना राज्य मंडळाव्यतिरिक्त शाळांना लागू असणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी या वेळापत्रकावर आक्षेप नोंदवला. ते म्हणाले, की संकलित मूल्यमापन चाचणी घेण्याचे वेळापत्रक शाळांना त्यांच्या स्तरावर ठरवण्याची मुभा असायला हवी. सर्वसाधारणपणे १५ एप्रिलनंतर पालकांचे विद्यार्थ्यांसह गावी जाण्याचे नियोजन असते. त्याशिवाय २५ एप्रिलपर्यंत परीक्षा घेतल्यास जास्त विद्यार्थीसंख्‍या असलेल्या शाळांमध्ये उत्तरपत्रिका तपासणी, निकाल तयार करणे, ऑनलाइन माहिती भरणे हे कामकाज करण्यासाठी वेळच मिळणार नाही. दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेऊन निकाल मे-जूनमध्ये जाहीर होतो, तर बाकी वर्गासाठी परीक्षा आणि निकालासाठी वेळ मिळायला हवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाळांमध्ये एकवाक्यता आवश्यक

राज्यातील पहिली ते नववीच्या परीक्षा साधारणपणे मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलमध्ये शाळा स्तरावरून घेतल्या जातात. एप्रिलच्या सुरुवातीलाच वार्षिक परीक्षा झाल्यास त्यानंतरच्या कालावधीत शाळा सुरू असल्या, तरी विद्यार्थी उपस्थिती पुरेशी असत नाही. अशा पद्धतीने वर्षाअखेरीस परीक्षा आयोजित करण्याऐवजी लवकर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मिळणारा कालावधी कमी होतो. तसेच, प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी, असे शिक्षण विभागाचे म्‍हणणे आहे, पण विदर्भात एप्रिल ते मे दरम्‍यान कडक उन्‍हाळा असल्‍याने या काळात परीक्षा घेतल्‍यास विद्यार्थ्‍यांना उन्‍हाच्‍या झळा सोसाव्‍या लागणार आहेत.