नागपूर : व्याघ्र अधिवासालगतचे राष्ट्रीय महामार्ग वाघांसाठीच नाही तर इतरही वन्यप्राण्यांसाठीही मृत्यूचा सापळा ठरत असताना अजूनही या महामार्गावरील उपशमन योजनांचे गांभीर्य सरकारला कळलेले नाही. राष्ट्रीय महामार्ग सातवरील उपशमन योजनांमुळे वन्यप्राण्यांचे अपघाती मृत्यू पूर्णपणे थांबले नसले तरी काही प्रमाणात कमी झाले आहेत. मात्र, राष्ट्रीय महामार्ग सहावर गेल्या १५ वर्षांपासून उपशमन योजनांच्या नावावर सावळागोंधळ सुरू आहे. मंगळवारी हा महामार्ग ओलांडणाऱ्या एका वाघाचा अपघाती मृत्यू थोडक्यात टळला.

राष्ट्रीय महामार्ग सहाच्या विस्तारीकरणाचा विषय समोर आला तेव्हा त्यात अनेक झाडांचा बळी जाणार असल्याने काही वन्यजीवप्रेमींनी न्यायालयात धाव घेतली. हे विस्तारीकरण न्यायालयात गेल्यामुळे त्यात काही वर्षे गेली. त्यानंतर या महामार्गावर वन्यप्राण्यांसाठी उपशमन योजनांसाठी आराखडा तयार करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेला सोपवले. २०१५ साली भारतीय वन्यजीव संस्थेने त्यांच्या अहवालात चार भुयारी मार्ग प्रस्तावित केले.

२०२० मध्ये पुन्हा आढावा घेण्यात आला आणि चारऐवजी पाच भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आले. या सर्व उपशमन योजना महाराष्ट्राच्या बाजूने होत्या, पण येथून छत्तीसगडकडे जाणाऱ्या या महामार्गावर कोणत्याही उपशमन योजना नव्हत्या. २०१० सालीच छत्तीसगड राज्यात या महामार्गाचे चौपदरीकरण झाले. या महामार्गावर दोन ते तीन ठिकाणी ‘ब्लाईंड टर्न’ आहेत. या वळणांवर वाहन आणि वन्यप्राणी एकमेकांसमोर आल्यानंतरच दिसतात. महामार्ग प्राधिकरणाने तर येथे नियमांचे उल्लंघन केलेच आहे, पण राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने देखील बघ्याची भूमिका घेतली. मंगळवारी एक वाघ महामार्ग ओलांडून जाताना दोन्ही बाजूने भरधाव ट्रक आले. सुदैवाने वाघाचा मृत्यू थोडक्यात टळला.

राष्ट्रीय महामार्ग सहावर महाराष्ट्राच्या बाजूने किमान उपशमन योजना प्रस्तावित आहेत आणि त्यामुळे या मार्गाचा विस्तारही रखडला आहे. पण, हाच महामार्ग छत्तीसगडमधूनही गेला आहे. त्याठिकाणी २०१० मध्येच झाडे कापून महामार्ग विस्तारीत करण्यात आला. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात झाडे तोडली गेली आणि कान्हा ते इंद्रावतीला जोडणारा चाबूकनाला कॉरिडॉर देखील खंडित झाला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नियम तोडले, पण राष्ट्रीय वन्यजीव मंडळ, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण देखील यावर गप्प बसले.

– मिलिंद परिवक्कम, रस्ते पर्यावरणशास्त्रज्ञ, लँडस्केप रिसर्च अँड कन्झर्वेशन फाउंडेशन.

राष्ट्रीय महामार्ग सहावरील वन्यप्राण्यांसाठी असणाऱ्या उपशमन योजनांचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हायला हवे. राष्ट्रीय महामार्ग सातवरून वन्यप्राण्यांच्या भ्रमणाचा अंदाज आलेला आहे. त्यामुळे त्यानुसार या उपशमन योजनांमध्येही बदल करायला हवे.

– उदयन पाटील, सृष्टी पर्यावरण मंडळ.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काळाच्या गरजेनुसार लहान रस्ते मोठे करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग चौपदरी करण्यात आले. मात्र, वन्यप्राण्यांना हे मोठे रस्ते ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळदेखील वाढला. त्याचवेळी या महामार्गावर वाहनांची वर्दळ आणि गतिरोधक नसल्यामुळे वाहनांच्या वाढत्या वेगात वन्यप्राण्यांचे अपघात देखील वाढत आहेत.

– दिनेश खाटे, हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी.