नागपूर : मानकापूर परिसरातील उड्डाणपुलावर शुक्रवारी स्कूलबस व स्कूलव्हॅन समोरासमोर धडकल्याने विद्यार्थिनीसह व्हॅन चालकाचा मृत्यू झाला. यातील स्कूलव्हॅनचा परवाना व योग्यता तपासणी झाली नसल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनात आला आहे. त्यामुळे भविष्यात या स्कूलव्हॅनची नोंदणी रद्द होण्याचे संकेत आहेत.
आरटीओच्या पथकाने अपघातग्रस्त जागेची पाहणी केली. पथकाला उड्डाणपुलावरील एकाच बाजूची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनात आले. स्कूलव्हॅन चालकाने एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुसऱ्या स्कूलबसला धडक दिल्याचे प्राथमिक तपासणीत दिसत आहे. या स्कूलबसमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक होत असतांनाही परवाना व योग्यता तपासणीची मुदत संपली असल्याचे पुढे आले. त्यामुळे आरटीओकडून या स्कूलव्हॅनला नोटीसही बजावली गेली होती.
या स्कूलव्हॅनचा विमा व कर मात्र भरला होता. सर्व कागदपत्र प्राथमिक चौकशीत योग्य असल्याचेही आरटीओच्या चमूच्या निदर्शनात आले. त्याबाबतचा अहवाल आरटीओकडून संबंधित यंत्रणेला पाठवला जाणार आहे. दरम्यान, स्कूलव्हॅन मालकाची अक्षम्य चूक बघता तातडीने त्याला परवाना नोंदणी रद्द करण्याबाबतची नोटीस बजावली जाणार आहे. त्यानंतर कायमची नोंदणी रद्द करण्याचेही संकेत आरटीओ कार्यालयाकूडन दिले गेले.
आरटीओकडून स्कूलबसची झाडाझडती, सहा स्कूलबस जप्त…
मानकापूर उड्डाणपुलावरील स्कूलबस आणि स्कूलव्हॅनच्या भीषण अपघातानंतर आरटीओच्या तीन भरारी पथकाकडून शहरात शनिवारी दिवसभर २३५ स्कूलव्हॅन, स्कूलबसची झडती घेतली गेली. त्यात दोषी आढळलेल्या ३७ बसेसला ई- चालान केले गेले. स्कूलबसची योग्यता तपासणी व परवाना नसलेले ६ वाहन जप्त करून विविध पोलीस ठाण्यात ठेवले गेले. ई- चालान केलेल्या स्कूलबस, स्कूलव्हॅन चालकांकडून ८४ हजार ७०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी आणि अविनाश राऊत यांच्या मार्गदर्शनात सतीश नवघरे, पवन बानबाकडे, अर्चना घाणेगावकर यांच्यासह चमूने केली.
स्कूलबतची घटना काय?
नागपुरातील कोरडी रोडवरील मानकापूर उड्डाणपुलावर एक स्कूलबस आणि स्कूलव्हॅनची एकमेकांना जबर धडक बसून झालेल्या अपघातात व्हॅनचा चालक व त्यातीलच विद्यार्थिनी असे दोघे जण ठार झाले. तर सात विद्यार्थी जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की, व्हॅन चकनाचर झाली. तिच्या केबिनमध्ये फसलेल्या चालकासह बेशुद्ध पडलेल्या विद्यार्थ्यांना कसेतरी व्हॅनचे दार वाकडे- तिकडेकरून बाहेर काढले गेले. घटनेनंतर येथे नागरिकांना रस्त्यावर ठिय्या देत पूल दुरुस्तीच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्रातदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत निदर्शने केली.