उपस्थिती ३७ टक्केच, तरी उत्साह कायम; करोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन
नागपूर : करोनाचे सावट कायम असतानाही दीड वर्षांनंतर शहरातील विद्यार्थ्यांनी आज सोमवारी शाळेची वाट धरली. महापालिका क्षेत्रातील इयत्ता ८ ते १२च्या १४९ शाळांमधील ४२ हजार ८४६ विद्यार्थ्यांमधून केवळ १६ हजार ६ म्हणजे ३७ टक्के विद्यार्थ्यांची पहिल्या दिवशी उपस्थिती होती. ग्रामीणमध्येही इयत्ता ५ ते १२ पर्यंतच्या शाळांमध्ये ४५ टक्के विद्यार्थी उपस्थित होते. एकूण विद्यार्थी संख्येच्या तुलनेत उपस्थितांची संख्या कमी असली तरी विद्यार्थ्यांची शाळेची ओढ,
मित्रांना भेटण्याचा उत्साह शंभर टक्के होता. अनेक महिन्यांनी शाळांमधील गजबजलेले वातावरण पाहून विद्यार्थी संख्या आणखी वाढेल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.
तब्बल दीड वर्षांनंतर सोमवारपासून शहरी भागात इयत्ता ८ ते १२ तर ग्रामीणमध्ये इयत्ता ५ ते १२वीपर्यंतच्या शाळांना सुरुवात झाली. शिक्षकही विद्यार्थ्यांची आतुरतेने वाट बघत होते. इतक्या महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शाळा सुरू होत असल्याने अनेक शाळांनी विद्यार्थ्यांचे औक्षन, गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. पहिल्याच दिवशी काहीसी उपस्थिती कमी असली तरी शाळांमध्ये दीड वर्षांनंतर किलबिलाट ऐकू आल्याने सारेच वातावरण आनंदमयी झाले.
मुलांना सकाळी शाळेत सोडून देताना पालकांच्या चेहऱ्यावरही आनंद स्पष्ट दिसत होता.
विद्यार्थी शाळेत दाखल होताना त्यांची तपासणी करण्यात आली. करोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करून शाळा सुरू करण्यात आल्या.
सुरक्षेचे काटेकोर पालन
शाळांमध्ये विद्यार्थी उपस्थित होताच त्यांची थर्मल तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी सुरक्षित व्यवस्था, स्वच्छतागृहांची योग्य व्यवस्था, शाळेच्या परिसरातील स्वच्छता अशा विविध बाबींची शाळांमध्ये काळजी घेण्यात आली होती. अनेक अनुदानित शाळांमध्ये मुख्याध्यापकांनी स्वत: उपस्थित राहून सर्व पाहणी केली.
महापौरांकडून गुलाबपुष्प देऊन स्वागत
विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी महापालिकेच्या हनुमाननगर येथील लालबहादूर शास्त्री इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. याप्रसंगी शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर, मनपा शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, शाळेचे मुख्याध्यापक संजय पुंड आदी उपस्थित होते. यावेळी महापौर म्हणाले की, करोना काळात सर्वात जास्त नुकसान शिक्षण क्षेत्राचे तसेच विद्यार्थ्यांचे झाले. मात्र या काळात त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून मनपाच्या शाळेतील शिक्षकांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन वर्ग घेतले. ज्या मुलांना ऑनलाईन शिक्षण शक्य नाही, अशा मुलांना त्याच्या घरी जाऊन शिकवण्यात आले. याचाच परिणाम असा की, यावर्षी मनपा शाळेतील पटसंख्या वाढली आहे. हे शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ आहे.
विद्यार्थी, शिक्षकही आनंदी
कालपर्यंत विद्यार्थ्यांविना शाळा सुरू होती. आज विद्यार्थी शाळेत आल्याचा आनंद विद्यार्थी आणि शिक्षकांमध्येही दिसून आला. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. यावरून पालकांच्या मनातील करोनाचे भय कमी झाल्याचे दिसून आले.
– दिलीप तडस, उपप्राचार्य, विदर्भ बुनियादी कनिष्ठ महा.
ऑनलाईन शिक्षण कायमस्वरूपी पर्याय नाही
ऑनलाईन शिक्षण ही कायमस्वरूपी सोय होऊच शकत नाही. मुलांना शाळेत पाठवणे आवश्यक आहे. शिवाय ते विद्यार्थीदशेत असल्याने त्यांचा मानसिक विकास हा शाळांमधून होऊ शकतो. काहीसी भीती असली तरी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायलाच हवे, हा विचार करून सकाळी मी स्वत: मुलाला शाळेत सोडले.
– रेणुका ठेंगडी, पालक.
शहरात ८९ तर ग्रामीणमध्ये ६१ टक्के शाळा सुरू
शहरातील सरस्वती विद्यालय, विदर्भ बुनियादी, सोमलवार, मुंडले अशा काही शाळांमध्ये ७० टक्केपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. मात्र, ग्रामीण भागात रुग्ण संख्या कमी असतानाही तेथील विद्यार्थ्यांची उपस्थिती मात्र कमी होती. ग्रामीणमध्ये १५३० पैकी केवळ ९४५ म्हणजे ६१ टक्के तर शहरी भागात १४९ पैकी १३४ म्हणजे ८९ टक्के शाळा सुरू झाल्या. शहरातील काही शाळांची तयारी सुरू असून त्या लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आहे.
वर्गखोल्या जिवंत झाल्या
आज बऱ्याच दिवसांनी शाळेची घंटा वाजली. प्रार्थनेमुळे शाळा दुमदुमली व वर्गखोल्या विद्यार्थ्यांच्या किलबिलाटामुळे जणू जिवंत झाल्या. विद्यार्थ्यांच्या चेऱ्यावरचा आनंद शब्दात व्यक्त करता येणे अवघड आहे. विद्यार्थ्यांना बघून शिक्षकांनाही खूप समाधान झाले.
– अनिल शिवणकर, सी.पी.अॅंड बेरार हायस्कूल.
घरी ऑनलाईन शिक्षणामुळे कंटाळा आला होता. कधी शाळेत जाते, शाळेला बघते व शिक्षकांना भेटते असे झाले होते. वर्गातील शिक्षणाची वाट बघत होते व तो आनंदाचा दिवस आज आला.
– पूर्वा उईके, वर्ग ९,सी.पी. अॅंड बेरार हायस्कूल.