लोकसत्ता टीम

वर्धा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच राज्यातील विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी ‘ प्रिय विद्यार्थी मित्रांना ‘ असे एक खुले पत्र लिहले. त्यात चांद्रयान, रोबोट प्रयोगशाळा, माहिती तंत्रज्ञान आदी विषयांसह पारंगत करणारे शिक्षण देत भविष्य उज्वल करण्याचे स्वप्न सांगितले. तसेच अन्य आश्वासन आहे. हे पत्र म्हणजे राज्यातील शालेय शिक्षणात ‘ऑल इज वेल’ असल्याचे चित्र उभे करते. पण खरेच तसे आहे का, असा सवाल राज्य शिक्षणसंस्था संचालक महामंडळ करते. या संघटनेचे सचिव मेघश्याम करडे यांनी खुले पत्र लिहून खरमरीत टीका केली.

मुख्यमंत्री शिंदे यांना त्यांनी काही सवाल केलेत. राज्यात २०१२ पासून शिक्षक भरती बंद आहे.विषयनिहाय पारंगत शिक्षक नाहीच.रोबोटिक प्रयोगशाळेत पदवीधर किंवा अभियंता शिक्षक नेमण्याचे आदेश काढले.पण एकही नियुक्ती नाही. विषय शिक्षक नाही अन् विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्याचे स्वप्न कसे?, मराठी शाळांची स्थिती विदारक झाली असून शिक्षक, शिपाई, परिचर,लिपिक नसल्याने कामकाज ठप्प पडले आहे. बहुजन वर्गास मिळणारे मोफत शिक्षण बंद करण्याचे हे षडयंत्र असून शिक्षणक्षेत्र कॉर्पोरेट कडे देण्याचा डाव आहे. परिपत्रकांचा भडिमार करून आलबेल असल्याचे चित्र निर्माण करणार का ? असाही सवाल मुख्यमंत्र्यांना आहे. भौतिक सुविधा नाहीत. इमारती मोडकळीस आल्यात. २००४ पासून भाडे मिळाले नाही. पिण्याचे पाण्याचे बिल देत नाही. मग आठ दिवसात शाळा सुंदर कशी करणार.

आणखी वाचा-नागपूर : सावधान! ‘मसाज-स्पा सेंटर’च्या नावावर तरुणींकडून देहव्यापार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेव्हा सर्व मराठी शाळा बंद पडतील तेव्हाच डोळे उघडतील. मात्र तोवर वेळ निघून गेली असेल. प्रचंड पैसे मोजून शिक्षण घ्यावे लागेल. आणि पैसे नसल्याने हा समाज आदिम संस्कृतीकडे वाटचाल करणार, असा गर्भित धोका मुख्यमंत्री शिंदे यांना सूचित करण्यात आला आहे. शिक्षण घेण्याची क्षमता संपलेली असेल. पोटचे गोळे गुरे ढोरे रखतील. मुख्यमंत्री शिंदे सांगा, अशी व्यवस्था व्हावी का. हे असे घडू नये म्हणून आंदोलन करणार. शिक्षण व्यवस्था मोडीत काढणारे धोरण राबविणाऱ्या शासन व प्रशासन विरोधात संघर्ष करणार. संघर्षासाठी तयार व्हा, असे आवाहन याच पत्रातून पालकांना पण करण्यात आले आहे. सर्वांनी तयार व्हावे. संस्थाचालक मंडळ तर परिक्षांवर बहिष्कार टाकणार, असाही इशारा आहे.