- राष्ट्रीय नागरी सुरक्षा महाविद्यालयाचे सहाय्यक संचालक
- आर. एस. चौधरी यांची लोकसत्ता कार्यालयाला भेट
युद्धजन्यस्थिती असो किंवा पूर, दुष्काळ भूकंप, आगीच्या घटना, रेल्वे अपघात, स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची गळती, हृदय विकाराचा धक्का अशा परिस्थितीत काय करावे हे सूचत नाही. सुचले तरी अयोग्य पद्धतीने पाऊल टाकले गेल्यास बचावापेक्षा नुकसान होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी देशातील एकमेव राष्ट्रीय नागरिक सुरक्षा महाविद्यालयात निशुल्क प्रशिक्षण दिले जाते. देशात सध्या अशाप्रकारचे प्रशिक्षणप्राप्त सहा लाख स्वयंसेवक तयार आहेत. लोकसंख्येच्या किमान एक टक्का म्हणजे सुमारे १२ कोटी लोकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी लवकरच जिल्हापातळीवर प्रशिक्षण देण्याची सोय करण्यात येणार आहे, असे राष्ट्रीय नागरिक सुरक्षा महाविद्यालयाचे सहाय्यक संचालक (रेक्स्यू) आर. एस. चौधरी यांनी सांगितले. लोकसत्ता कार्यालयाला त्यांनी भेट दिली. यावेळी महाविद्यालय स्थापन करण्याचा उद्देश, नागरिक सुरक्षेचे महत्त्व, युद्धजन्य स्थिती, नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीत घ्यावयाची काळजी आणि करावयाच्या उपाययोजना अशा वेगवेगळ्या मुद्दय़ांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली.
शहरातील सिव्हिल लाईन्समधील राष्ट्रीय नागरिक सुरक्षा महाविद्यालय हे अशाप्रकारचे देशातील एकमेव महाविद्यालय आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांना तसेच स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जाते. शाळा, महाविद्यालयांनी इच्छा व्यक्त केल्यास विद्यार्थ्यांना आवश्यतेनुसार तीन ते सात दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते.
‘सेंट्रल इमरजन्सी रिलिफ ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट’ ही संस्था इमरजन्सी रिलिफ ऑर्गनायझेशनला मदत करण्यासाठी १९५७ मध्ये स्थापन करण्यात आली. कालांतराने १९६८ला जनसुरक्षा आणि मदत करण्यासाठी उपाययोजनांचा समावेश करण्यात आला. त्याचे नाव देखील बदलण्यात आले. सध्या येथे २७ नियमित अभ्यासक्रम चालवण्यात येतात. वर्षांला साधारणत: ११ ते १२ हजार लोकांना प्रशिक्षण दिले जाते. अधिकारी लोकांसाठी व्यवस्थापन अभ्यासक्रम आणि कर्मचाऱ्यांना कौशल्य विकास असे अभ्यासक्रम आहेत.
कोणत्याही शहराला दहशतवाद्यांकडून संभावित धोका आहे. याचा अभ्यास केल्यानंतर त्या शहरांना नागरिक सुरक्षा वर्गीकृत म्हणून निश्चित केले जाते. देशात सध्या २२५ शहरे या गटात असून महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि तारापूर यांच्या समावेश आहे. त्या शहरात नागरिक सुरक्षेसाठी खास उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. त्या त्या जिल्ह्य़ात नागरिक सुरक्षा समिती स्थापन केली जाते. यात स्वयंसेवक असतात. भूपंक, रेल्वे अपघात, पूर, दुष्काळ किंवा शहशतवादी हल्ल्यानंतर लोकांना हे स्वयंसेवक मदत करतात. यांची ओळख म्हणजे पिवळ्या रंगाचे जॅकेट आहे. ते गर्दीला नियंत्रित करण्याचे काम करतात. अपघातात दुखापत झालेल्यांना प्राथमिक उपचार देखील त्यांच्याकडून दिला जातो. बंगळुरू आणि जयपूर येथे नागरिक सुरक्षा स्वयंसेवक अतिशय चांगल्याप्रकारे काम करीत आहेत. पोलीस आणि अग्निशमन दल यांच्याशी ते समन्वय साधून काम करीत असतात, असेही ते म्हणाले.
कोण घेऊ शकतो प्रशिक्षण
शासकीय अधिकारी, बँक अधिकारी, राज्य राखीव पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, अग्निशमन दल, औद्योगिक संस्थांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. खासगी संस्थांना देखील मागणी केल्यास प्रशिक्षण निशुल्क दिले जाते. खासगी संस्था, लोकांचा समूह, संघटना यांनी एकत्र येऊन प्रशिक्षणाची मागणी केल्यास प्रशिक्षण दिले जाते. निवासी प्रशिक्षण संस्था असल्याने येथे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आहे. त्यासाठी नाममात्र दर आकारण्यात येतो.
नागपूरकरांनी नागरिक सुरक्षा प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा
देशात दर दोन-तीन वर्षांनी कुठलीतरी नैसर्गिक आपत्ती येते. त्यात मोठय़ा प्रमाणात जीवित, वित्तहानी होते. रासायनिक, जैविक आपत्ती, रेल्वे अपघातात आपातकालीन प्रतिसाद, औद्योगिक आपातकालीन व्यवस्थापन, बेसिक लाईफ सपोर्ट, मॅनेजमेंट ऑफ मीडिया, नागरी सुरक्षा आणि आपातकालीन व्यवस्थापन, न फुटलेले बॉम्ब आणि स्फोटकांपासून सुरक्षा, पूर आणि चक्रीवादळ आपातकालीन प्रतिसाद यासह तीन ते सहा आठवडय़ांचे २७ अभ्यासक्रम आहेत. या महत्त्वाच्या संस्थेचा लाभ नागपूर आणि विदर्भातील शाळा-महाविद्यालय, स्वयंसेवी संस्थांनी घ्यावा, असे आवाहन चौधरी यांनी केले.