नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विचार करता काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांना राजस्थानऐवजी महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवावे, असे पत्र पक्षश्रेष्ठींना पाठवले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यात आले तरी ते मागे घेऊन नव्याने उमेदवारी दाखल करणे शक्य आहे, असे मत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सोमवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

काँग्रेसने इमरान प्रतापगडी यांना महाराष्ट्रातून तर मुकुल वासनिक यांना राजस्थानमधून राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. प्रतापगडी हे उत्तर प्रदेशचे असून त्यांनी आज अर्ज देखील भरला. त्यांच्या उमेदवारीवरून महाराष्ट्रातील काँग्रेसजणांमध्ये नाराजी आहे. त्याबाबत चव्हाण यांना विचारले असता त्यांनी पक्षश्रेष्ठींना त्यासंदर्भात पत्र लिहिल्याचे सांगितले. अर्ज भरण्याचा आणखी एक दिवस शिल्लक आहे. त्यामुळे ते शक्य आहे. वासनिक हे महाराष्ट्रातील असल्याने त्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये लाभ होऊ शकतो. राजस्थानमधून ते राज्यसभेत गेल्यास त्यांना महाराष्ट्रात निधी खर्च करता येणार नाही. त्यामुळेच ही मागणी आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या ध्येयधोरणावर टीका केली. देशाची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे. देशात अनेक महासाथी आल्या, पंरतु आधीच्या सरकारने कधी त्यासाठी लागणाऱ्या लसीकरणाकरिता जनतेकडून पैसे घेतले नाही. मात्र करोनाच्या महासाथीमध्ये मोदी सरकारने लोकांकडून पैसे वसूल केले. देशात निवडून आलेली हुकूमशाही सुरू आहे. केंद्र सरकार तपास यंत्रणाचा वापर राजकीय स्थार्थासाठी करीत आहेत. एकाही प्रकरणांचा तपास शेवटाला जात नाही. केवळ विरोधकांमध्ये दहशत निर्माण करणे आणि त्यांची बदनामी करण्याचा हेतू आहे, असा आरोपही त्यांनी केला.

..तर भाजप चारी मुंडय़ा चीत

महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी एकत्रित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढल्यास भाजपला चारी मुंडय़ा चीत करणे शक्य आहे. त्यासाठी प्रत्येक पक्षाला स्थानिक पातळीवर थोडाफार नफा किंवा तोटा सहन करण्याची तयारी ठेवावी लागेल, असेही चव्हाण म्हणाले.

२०२४ ची लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या नेतृत्वातच

मे २०२४ मध्ये होणारी लोकसभा निवडणुकीतील लढाई निर्णायक ठरणार आहे. एकटय़ा काँग्रेसमध्ये किंवा कोणत्याही एका प्रादेशिक पक्षाकडे मोदींना हरवण्याची ताकद नाही. व्यापक विचार करता काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच समविचारी पक्षांना या निवडणुकीला सामोरे जावे लागेल. कारण, काँग्रेस एकमेव पक्ष आहे, ज्याचे सर्व राज्यांमध्ये अस्तित्व आहे. धर्मनिरपक्षेप पक्षांची आघाडी करून लोकशाही वाचवण्याची ऐतिहासिक जबाबदारी काँग्रेसवर आहे, असेही चव्हाण म्हणाले.