नागपूर : उपराजधानीला दरवर्षी उन्हाचा तडाखा बसतो, पण मागील सलग दोन वर्षे टाळेबंदीमुळे लोक घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळे उष्माघात कृती आराखडा तयार केला किंवा नाही, याचा काहीच फरक पडला नाही. मात्र, यावर्षी हवामान खात्यासह अभ्यासकांनी तापमानवाढीचे केलेले भाकित खरे ठरले आहे. तरीही उष्माघात कृती आराखडय़ाची गांभीर्याने अंमलबजावणी होताना दिसून येत नाही.
गेल्या १०० वर्षांतील सर्वाधिक तापमान यावर्षी नोंदवले जात आहे. कधी नाही ते एप्रिल महिन्यात उपराजधानीत तापमान ४५ अंशाच्या वर गेले आहे. उष्णतेच्या एक-दोन नाही तर तीन-चार लाटा एप्रिल महिन्यातच येऊन गेल्या. त्याची पूर्वकल्पना हवामान खाते आणि अभ्यासकांनी दिली होती. त्यानंतरही महापालिकेने उष्माघात कृती आराखडा तायर करायला एप्रिल महिना उजाडण्याची वाट पाहिली. एवढेच नाही तर अतितीव्र उष्णतेच्या लहरी येणार हे माहिती असतानाही आराखडा अंमलबजावणीत ढिसाळपणा दिसून येत आहे. हवामान कृती आराखडय़ानुसार उष्णतेच्या लाटांबाबत नागरिकांना सावध करण्यासाठी भ्रमणध्वनीवर संदेश पाठवले जातात, पण यावेळी ४५ अंश सेल्सिअसपार तापमान जाऊन देखील हे संदेश नागरिकांना मिळालेले नाहीत. ट्विटरवरून आता कुठे संदेश देण्यात येत आहे.
गेली काही वर्षे महापालिकेने हवामान कृती आराखडय़ाची अंमलबजावणी तापमान ४३ अंशापेक्षा अधिक गेल्यानंतर सुरू केली होती. मात्र, महापालिका प्रशासन अजूनही करोनाकाळातच आहेत की काय, अशी स्थिती आहे.
काय म्हणते महापालिका?
यापूर्वी ज्या स्वयंसेवी संस्थांना पाणपोईसाठी आवाहन केले जात होते, त्यांना यावेळीही देखील आयुक्तांच्या सहीनिशी पत्र दिलेले आहे. दवाखाना, बँक, पेट्रोल पंप अशा बऱ्याच ठिकाणी पाणपोई लावण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्येकाला ती लावण्याची विनंती करता येते, पण आग्रह करता येत नाही. उष्माघाताचा सर्वाधिक फटका भिकाऱ्यांना बसतो. त्यांच्यासाठी दुपारच्या जेवणाची तसेच खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. भित्तिपत्रके, स्मार्ट सिटीचे चौकाचौकात लावलेल्या डिजिटल फलकांच्या माध्यमातून तसेच ट्विटर, फेसबुक या समाजमाध्यमातून नागरिकांना सूचना दिल्या जात आहेत. – डॉ. विजय जोशी, अतिरिक्त सहाय्यक आरोग्य अधिकारी, महापालिका.
रणरणत्या उन्हात बांधकामेही सुरू
कृती आराखडय़ानुसार दुपारी १२ ते ३ या वेळेत बांधकामासारखी बाहेरची कामे बंद ठेवणे बंधनकारक आहे, पण शहरात मेट्रो असो वा सिमेंट रस्त्याची कामे ही या वेळेतच सुरूच आहेत. भर उन्हात दुकानेही सुरू आहेत.
पानपोई दिसेना
करोनाचे सर्व निर्बंध उठवल्यानंतर नागरिक मोठय़ा संख्येने बाहेर पडू लागले. त्यांच्यासाठी पाणपोईची व्यवस्था दिसून येत नाही. उद्यानांमध्ये पाणपोईची व्यवस्था नाही. चौकाचौकात व्यापाऱ्यांना मदतीला घेऊन पाणपोई सुरू केल्या जातात, पण यावर्षी त्या देखील दिसून येत नाहीत. शासकीय कार्यालये, शासकीय व खासगी दवाखाने, पेट्रोल पंप आदी ठिकाणी पाणपोई लावण्याचे आवाहन महापालिकेकडून केले जाते. त्याचेही आदेश आणि अंमलबजावणी झालेली नाही. अनेक स्वयंसेवी संस्था दरवर्षी मोठय़ा प्रमाणात नागरिकांसाठी प्याऊ सुरू करतात. मात्र, अजूनही या संस्थांपर्यंत महापालिका पोहोचलेली नाही.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
mining projects in sindhudurg
सिंधुदुर्गातील खनिज प्रकल्प कायमचे बंद व्हावेत; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पर्यावरणवाद्यांना अपेक्षा
The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?
Maldhok birds
अग्रलेख: पूतनामावशीचे पर्यावरणप्रेम!