लोकसत्ता टीम

बुलढाणा : एप्रिल मध्यापासून जिल्ह्यात पाणी पेटले असताना मे महिन्याच्या प्रारंभीच जिल्ह्यात जलसंकटाचे सावट अधिकच गडद झाले. लाखो ग्रामस्थांची तहान टँकर, विहिरींद्वारे भागविली जात असताना जिल्ह्यातील बहुतेक लहानमोठ्या धरणातील जलसाठ्यात लक्षणीय घट झाली आहे. यामुळे यंदा पाणी जिल्हा प्रशासनाची अग्निपरीक्षा ठरणार आहे.

जिल्ह्यात यंदा डिसेंबर २०२३ अखेरीस दोन टँकर लागले. यानंतर त्यात झपाट्याने वाढ होत गेली. सध्या ५ तालुक्यातील ४७ गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. तब्बल १ लाख १७ हजार ४९५ लोकसंख्येच्या या गावांची तहान टँकरने होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठाद्वारे भागविली जात आहे. याशिवाय ८ तालुक्यातील १३६ गावांना १६८ अधिग्रहित खासगी विहिरींद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे सव्वातीन लाख ग्रामस्थांचे हाल होत आहे. लोकसभा निवडणूक व आचारसंहितामुळे सत्ताधारी व विरोधी पक्षांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. मेहकर, देऊळगाव राजा, चिखली तालुक्यांत टंचाईचे चित्र भीषण आहे.

आणखी वाचा-नागपूर : शिक्षणापासून वंचित १८० बालकांसाठी उघडणार शाळेची दारे

धरणांनी तळ गाठला

जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. सूर्य आग ओकू लागल्याने जलसाठ्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे. बृहतपैकी खडकपूर्णा प्रकल्पात ५६.७१ दलघमी इतका मृत जलसाठाच उरला आहे. नळगंगामध्ये १८.१४ तर पेन टाकळीमध्ये ९.४४ टक्के इतकाच जलसाठा उरला आहे. मध्यम धरणाची अशीच स्थिती आहे. तोरणा ७.३५, मन १२.६५, उतावली २०.२१, कोराडी २४.४० टक्के या धरणातील जलसाठा चिंताजनक म्हणावा असाच आहे. ज्ञानगंगा ३९.३२,मस ३२.५७, पलढग धरणात ३४ टक्के जलसाठा आहे. दुसरीकडे ४१ लघु प्रकल्पात केवळ १६.६७ टक्के जलसाठाच शिल्लक आहे. यातील काही प्रकल्प कोरडे पडले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निधीचीही टंचाई

जिल्हा प्रशासनाला पाणीटंचाई इतकीच निधी टंचाईची समस्यादेखील भेडसावत आहे. ३० कोटींच्या कृती आराखड्यातील १९९ उपाययोजना प्रगतीपथावर आहेत. यावर २.८५ कोटी खर्च झाले आहेत. मात्र जिल्ह्याला कवडीचाही निधी मिळाला नाही.